मुंबई । नगर सहयाद्री
पावसामुळे खरीप पिकांना जीवदान, राज्यात पाणीसाठ्यांत वाढ
राज्यात जून महिन्यात काही भागात पावसाने दडी मारली होती. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं असून बळीराजा सुखावला आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तास राज्यात पावसाची स्थिती अशीच राहणार आहे.
पावसाचा अंदाज आणि अलर्ट
हवामान खात्याने शुक्रवारी पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस उघडीप घेऊ शकतो. आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. रायगड आणि सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर तसेच पुण्यासह किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम घाटात पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते, त्यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
आज पावसाची शक्यता असलेले भाग
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज बुधवारी नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसाचा प्रभाव आणि पाणीसाठा
राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्व धरणांमध्ये ३९.१७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये ५३.१२ टक्के इतका पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागात सर्वात कमी म्हणजे १२.१३ टक्के पाणीसाठा आहे, तर नाशिक विभागात २८.३४ टक्के पाणीसाठा आहे.