मुंबई। नगर सहयाद्री
देशातील अनेक राज्यात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून आता उन्हाळ्यात पावसाळा अशी स्थिती पाहायला मिळणार आहे. एकीकडे कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे हवामान खात्याने देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तरेकडील पर्वतांवर पुढे सरकत आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत पश्चिम हिमालयात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. यादरम्यान, हिमवर्षाव देखील होऊ शकतो. तर पंजाब, हरियाणा, केरळ, सिक्कीम आणि ईशान्य भारतात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिण भागात हलका पाऊस पडू शकतो.
महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
पुढील चार ते पाच दिवस राज्यातील कमाल तापमानात 2 ते 3 अंशानी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतही आर्द्रतेचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे तापमानाचा पार चाळीशीपार जाऊ शकतो. कोकण आणि मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.