पाथर्डी । नगर सहयाद्री
साधूच्या वेशात आलेल्या दोन भामट्यांनी तुम्हाला आशीर्वाद देतो, असे म्हणून महिलेच्या गळ्यातील सुमारे पावणे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी दुपारी शेवगाव रोडवरील एका दोन इसम साधूच्या वेशात दुकानासमोर आले. त्यातील एक जण दुकानात भिक्षा मागण्यासाठी आला. घटनेतील महिलेने साधू वेशात आलेल्या भामट्याला पाच रुपये दक्षिणा दिली. त्यानंतर त्यांनी महिलेला अशीर्वाद देतो. असे म्हणून हातात काहीतरी गुंगी येण्यासारखे औषध देऊन ते फुकण्यास सांगितले. त्यानंतर भामट्या साधूने महिलेकडे आणखी पैसे मागितले. यानंतर गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण व बारा ग्रॅमचे पेंडल ते काढून दे असे सांगितले.
ते काढता येत नाही असे महिलेने सांगितले. ते फक्त काढून दाखवा असे इसमाने सांगीतले. तेव्हा महिलेने गळ्यातून सोन्याचे दागिने काढून दिले. त्यानंतर साधूच्या वेशात आलेला भामटा बाहेर निघून गेला. त्यानंतर काही वेळानंतर घडलेला प्रकार महिलेचा लक्षात आला. त्यानंतर मात्र साधूच्या वेशात आलेले दोन भामटे पसार झाले होते. शेवगाव रोड परिसरात अनेक ठिकाणी हे भामटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.