नवी दिल्ली / नगर सह्याद्री : ज्ञानवापी प्रकरणात एक महत्वाची अपडेट आली आहे. वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणात आज बुधवारी जिल्हा न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अ जय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात मंगळवारी हिंदू आणि मुस्लिम पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला. आज अखेर ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यासांच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानवापी मशिदीमध्ये एक तळघर आहे, ज्यामध्ये सोमनाथ व्यास देवाच्या मूर्तीची पूजा करायचे. आता विश्वनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनी इथे पूजा करावी आणि बॅरिकेड्स हटवण्याची व्यवस्था करावी, असे जिल्हा न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. सोमनाथ व्यास यांचे नातू शैलेंद्र पाठक यांनी तळघरात पुजेची परवानगी मागितली होती. 17 जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाने व्यासांच्या तळघराचा ताबा घेतला होता. एएसआयच्या सर्वेक्षणाच्या कारवाईदरम्यान हे तळघर स्वच्छही करण्यात आले.
न्यायालयाने आदेशात काय म्हटले?
वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटले की, व्यासांच्या तळघराचा ताबा वाराणसीचा जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे आला आहे, त्यामुळेच विश्वनाथ मंदिराचे पुजारी ते तळघर स्वच्छ करुन तिथे नियमित पूजा करतील. तिथे लावलेले बॅरिकेडिंगहीं हटवण्याचे निर्देश दिले आहेत. वाराणसी न्यायालयाने सोमनाथ व्यास यांच्या कुटुंबीयांना या पूजेचा अधिकार दिला.