पुणे / नगर सह्याद्री : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. गँगवारमधून झालेल्या या हत्या प्रकरणानंतर पुणे हादरले होते. दरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे या पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
गणेश मारणे गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. गणेश मारणे तुळजापूर येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिस तुळजापुरात दाखल झाले. परंतु तो पुढे कर्नाटक गेला. यामुळे गुन्हे शाखेचे दुसरे पथक कर्नाटकमध्ये पोहचले.
परंतु पुन्हा एकदा गणेश मारणे याने पोलिसांना चकवा दिला. तो कर्नाटकमधून केरळमध्ये पसार झाला. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ओडिशा राज्यात गेला. तेथून पुन्हा नाशिकमध्ये आला. अखेर पोलिसांनी सापळा लावत मारणेसह त्याच्या साथीदारांना मोटारीतून जात असताना पकडले. त्यांना मोशी टोलनाक्याजवळ ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.