अहमदनगर। नगर सहयाद्री
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील मदती करीता दाखल झालेल्या प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून, नगर जिल्ह्यातील २४१ शेतक-यांना या योजनेच्या माध्यमातून ४ कोटी ७१ लाख रुपयांची रक्कम मंजुर झाली असल्याची माहीती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शेती व्यवसाय करताना होणारे अपघात तसेच रस्त्यावरील अपघात व विविध कारणांनी शेतक-यांच्या होणा-या मृत्युच्या घटना तसेच या घटनांमध्ये अपंगत्व आल्यास संबधित कुटूंबाला आर्थिक मदतीचा लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली आहे.
या योजनेचा लाभ मिळावा म्हणून २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीत राज्यातील २ हजार १३७ प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल करण्यात आले होते. यामध्ये नगर जिल्ह्यातील २४१ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यामध्ये २३० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या आणि ११ शेतकर्यांना अंपगत्व आल्याच्या घटनांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील २४१ कुटूबांना समारे ४ कोटी ७१ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. अपघाती मृत्यु झाल्यास रुपये २ लाख व अपंगत्व आल्यास रुपये १ लाख रुपयांची मदत या योजनेच्या माध्यमातून दिली जात असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि आधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.