खा. विखे, कर्डिलेंच्या माध्यमातून विकास कामांचा सपाटा | आ. लंके यांचाही गावागावात श्रीगणेशा
सुनील चोभे| नगर सहयाद्री
लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने तालुक्यातील राजकारणाने जोर धरला आहे. असे असले तरी लोकसभेच्या अनुषंगाने तालुक्यातील गावागावांमध्ये खा. सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून विकास कामांचा श्रीगणेशा केला जात आहे. आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातूनही गावोगावी कामाचा शुभारंभ होत आहे. विखे, कर्डिले यांच्या माध्यमातून तालुक्यातील पदाधिकार्यांना ताकद देण्याचे काम होत असल्याने तालुक्यातील भाजपला अच्छे दिन आल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांत आहे.
आगामी काळात लोकसभा आणि त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका होत नाहीत, तोच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. ओबीसी आरक्षण आणि गट-गणांचा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सुमारे दोन वर्ष होऊ शकल्या नाहीत. असे असले तरी लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे.
लोकसभेसाठी खासदार सुजय विखे यांनी साखर वाटपाच्या माध्यमातून तालुका पिंजून काढला आहे. साखर पेरणी करत लोकांचे तोंड गोड केले आहे. तसेच गावागावात विकास कामांचा श्रीगणेशा केला आहे. दुसरीकडे आमदार लंके हेही विविध निधीतून मंजूर करुन आणलेल्या विकासकामांचा शुभारंभ करत आहेत. होऊ घातलेल्या लोकसभेच्या अनुषंगाने खा. विखे, आ. लंके यांच्याकडून नगर तालुक्यात दौरे सुरु आहेत. या दौर्यात एकमेकांवर टीका करण्याची दोघेही एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे तालुक्यात खा. विखे, आ. लंके यांचे दौरे चर्चेचा विषय ठरत आहेत.
विखे, कर्डिलेंचा मोठा आधार
नगर तालुक्यात जिल्हा बँकेेचे अध्यक्ष तथा भाजप नेते शिवाजी कर्डिले यांचे प्रस्थ मोठे आहे. गत लोकसभा निवडणुकीपासून डॉ. सुजय विखे यांचा नगर तालुक्यात संपर्क वाढला आहे. खा. विखे, अध्यक्ष कर्डिले यांचा तालुक्यातील नागरिकांना तसेच भाजप पदाधिकार्यांना मोठा आधार मिळत आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक कार्ले पक्षाची धुरा सांभाळत आहेत.
शिवसेना, राष्ट्रवादी दुभंगली
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या दोन गटामुळे नगर तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी दुभंगली आहे. तालुक्यात शिवसेनेची (ठाकरे गटाची) धुरा राजेंद्र भगत सांभाळत आहेत. शिवसेना (शिंदे गटाची) जबाबदारी अजित दळवी यांच्यावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी रोहिदास कर्डिले यांच्याकडे आहे. ते माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना मानणारे आहेत. एकूणच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीमुळे दोन्ही पक्षांची ताकद दुभंगली आहे.
काँग्रेसला संघटनात्मक बांधणीची गरज
देशात, राज्यात, अहमदनगर जिल्ह्यासह नगर तालुक्यातही काँग्रेसची मोठी वाताहात झालेली दिसून येते. काँग्रेसची नगर तालुक्याची जबाबदारी अरुण म्हस्के यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तालुक्यातील काँग्रेसला उर्जितावस्थेत आणण्यासाठी म्हस्के यांना मोठी संघटनात्मक बांधणी करण्याची आवश्यकता आहे.
तालुक्यात लंके पॅटर्नची स्वतंत्र यंत्रणा!
गेल्या विधानसभा निवडणुकीत नीलेश लंके यांनी दणदणीत विजय मिळवला. नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नगर तालुक्यात गावागावात तरुणांची फळी निर्माण केली आहे. तालुक्यातील व मतदारसंघातील गावांमध्ये भरीव कामे केल्याने प्रत्येक गावात आमदार लंके यांचा स्वतंत्र गट तयार झाला आहे.