मुंबई ।नगर सहयाद्री:-
गँगस्टर छोटा राजनचा जवळचा साथीदार कुख्यात गुंड डीके रावला अटक करण्यात आली आहे. एका हॉटेल व्यावसायिकाला अडीच कोटीची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन मुंबई गुन्हे शाखेने डीके रावसह सात आरोपींना अटक केली आहे. मुंबईतील गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाला या हॉटेल व्यावसायिकाकडून तक्रार मिळताच डीके राव आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई करण्यात आली.
डी के राव हा दिलीप मल्लेश वोरा नावाने सुद्धा ओळखला जातो. मुंबईच्या माटुंग्यात जन्मलेल्या डी के रावच बालपण झोपडपट्टीमध्ये गेलं. डीके राव हा मुंबईतील एक कुख्यात गुंड असून ज्याचा मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. खंडणी, दरोडा आणि इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये तो सहभागी होता. चोरी आणि लुटमारी सारख्या गुन्ह्यांनंतर तो छोटा राजन टोळीत सहभागी झाला. मुंबईतील व्यावसायिक आणि विकासकांना लक्ष्य करून खंडणी रॅकेट चालवण्यात असल्याने ती चर्चेत होता. गेल्या काही वर्षांत त्याला विविध गुन्ह्यांसाठी अनेक वेळा अटक करण्यात आली आहे.
सात वर्षापूर्वी देखील डीके राव याला ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. धारावी झोपडपट्टीत एसआरएअंतर्गत पुनर्वसन प्रकल्पाचे काम घेतलेल्या बिल्डरला डीके रावने धमकावले होते. त्याच्या विरोधात यापूर्वी मुंबईत २० गुन्हे दाखल आहेत. छोटा राजनच्या इशाऱ्यावरुन डी के राव बिल्डर्सकडून वसुलीची कामे करायचा आणि कोणी नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा. डीके राववरील या कारवाईमुळे मुंबईत पुन्हा खंडणीच्या रॅकेट सुरु असल्याचे उघड झालं आहे.