कर्जत | नगर सह्याद्री
आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. आरक्षणास विलंब होत असल्याने अनेकांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. याच दरम्यान कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा ग्रामपंचायतीच्या विद्यमान महिला सदस्या अश्विनी शरद गांगर्डे यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. तर त्यांचे पती भारतीय जनता पार्टीचे कर्जत तालुका सरचिटणीस शरद चंद्रभान गांगर्डे यांनी देखील आपल्या पक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत सदस्या अश्विनी गांगर्डे यांनी आपला सदस्य पदाच्या राजीनामाचे पत्र गटविकास अधिकारी, तहसिलदार कर्जत, ग्रामसेवक निमगाव गांगर्डा यांना पाठविले आहे.
शरद गांगर्डे यांनी आपल्या कर्जत तालुका भाजपा सरचिटणीस पदाच्या राजीनामाचे पत्र भाजपाचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांना पाठविले आहे.निमगाव गांगर्डा सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पुढार्यांना गावबंदी करण्यात आली आहे.
त्या पाठोपाठ ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या अश्विनी शरद गांगर्डे यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या सदस्याचा तर शरद गांगर्डे यांनी पक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे.