पारनेर | नगर सह्याद्री
जी एस महानगर बँकेची निवडणूक लवकरच होणार असून यासाठी मतदारांची नवीन यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. याबाबतची सुचना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई यांनी प्रसिद्ध केली आहे. मतदारयादी 4 एप्रिल रोजी प्रसिद्ध होत आहे. या प्रारुप मतदार यादीवर 10 मार्च ते 4 एप्रिल सुट्यांचे दिवस वगळता हरकती घेण्यासाठी वेळ दिला आहे.
दि.4 एप्रिल रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर जी एस महानगर बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर होणार आहे. गेली पन्नास वर्षांपूव जी एस महानगर बँकेची स्थापना सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी केली आहे. मुंबई उपनगरी शहरांतील पारनेर स्थायिक तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मुंबई स्थायिक जनतेसाठी या बँकेचा जिल्ह्यातील लोकांना आर्थिक बाबतीत पाठबळ मिळावे तसेच पारनेर तालुक्यातील लोकांना मुंबई येथे स्थिरस्थावर होऊन व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या लोकांना आर्थिक विकास होण्यासाठी, नोकरी व अन्य कारणाने मुंबई येथे आलेल्या लोकांना फायदा होण्यासाठी सॉलिसिटर शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी या बँकेची स्थापना केली.
आजमितीला कोट्यावधी रुपयांच्या ठेवी व मोठ्या प्रमाणात कर्जवाटप करीत बँकेच्या अहिल्यानगर, पुणे, औरंगाबाद, नाशिक तसेच मुंबई उपनगरी शहरांमध्ये 67 शाखा कार्यरत आहेत. बँकेच्या ठेवी तीन हजार कोटी असून दिड हजार कोटीचे कर्जवाटप आहे. गुंतवणूक दिड हजार कोटींची असून खेळते भांडवल साडेतीन हजार कोटी आहे.
सभासद संख्या 80 हजार पेक्षा जास्त असून बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम असल्याने बँकेचा नावलौकिक मोठा आहे. सुमनताई शेळके या बँकेच्या अध्यक्षा तसेच भास्करराव कवाद हे उपाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. जी एस महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके व माजी अध्यक्ष ॲड उदय शेळके यांच्या विचारसरणीतून बँकेचा कारभार सक्षमपणे सुरू आहे. एप्रिल मध्ये संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर होणार आहे.