अहमदनगर । नगर सहयाद्री:-
विवाह सोहळ्याची लगबग सुरू असताना चोरट्यांनी डाव साधत एका महिलेची चार लाख १४ हजार ५६१ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व एक नोकिया कंपनीचा मोबाईल असलेली पर्स चोरून नेली आहे. ही घटना नगर तालुक्यातील नारायणडोह शिवारातील शानिराज मंगल कार्यालयात घडली.
या प्रकरणी रामदास तुकाराम जैद (वय ६४ रा. चिंचवड, पुणे) यांनी सोमवारी (१ जुलै) सायंकाळी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी जैद यांच्या नातेवाईकांच्या मुलीचा विवाह सोहळा नारायणडोह येथील शानिराज मंगल कार्यालयात रविवारी (३० जून) दुपारी आयोजित करण्यात आला होता.
विवाह सोहळ्यासाठी फिर्यादी व त्यांची पत्नी आले होते. विवाह सोहळा पार पडल्यानंतर स्टेजवर धार्मिक विधी तसेच नवरदेव-नवरी समवेत फोटो काढण्यासाठी नातेवाईक व मित्रमंडळींनी गर्दी केली होती. फिर्यादी यांच्या पत्नीही स्टेजवर गेल्या होत्या. त्यांनी त्यांच्या कडील सोन्याचे दागिने व नोकिया कंपनीचा मोबाईल जवळील पर्समध्ये ठेवले होते.
दुपारी २.४० ते २.४५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चार लाख १४ हजार ५६१ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व नोकिया कंपनीचा मोबाईल असलेली पर्स फिर्यादी जैद यांच्या पत्नीची नजर चुकवून चोरून नेली. ही बाब उघडकीस आल्यानंतर आणि विवाह सोहळा पार पाडल्यानंतर सोमवारी सायंकाळी जैद यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.