अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पारनेरच्या राजकारणात निर्णायक भूमिका घेत निलेश लंके यांना आमदार करण्यासह त्यांना खासदार करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे पारनेरचे माजी आमदार नंदकुमार झावरे हे पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. पूर्वाश्रमीचे ते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. विखे पाटलांच्यामुळेच त्यांना सलग दोन वेळा विधानसभेत संधी मिळाली होती. मात्र, त्यांनी सुजय विखे यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा होत असताना विखे पाटलांची साथ सोडली आणि निलेश लंके यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला होता. आता ते पुन्हा विखे पाटलांच्या व्यासपीठावर दिसू लागल्याने ते स्वगृही परतल्याचे मानलेे जात आहे.
नगर शहरात महिनाभरापूव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सावेडी उपनगरात झालेल्या एका कार्यक्रमात नंदकुमार झावरे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी काही व्यक्तीगत कामानिमित्त त्यांची हजेरी असेल अशी चर्चा झडली. मात्र, दोन दिवसांपूव नगरमध्ये पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत दक्षिण जिल्ह्यातील भाजपाच्या निवडक नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या लोणी- प्रवरानगर येथील दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. या बैठकीत नंदकुमार झावरे यांनी हजेरी लावली आणि चर्चेत सहभाग देखील नोंदविला.
माजी आमदार झावरे हे कायम विखे पाटलांच्याच सोबत राहिले. मात्र, सहा वर्षापूव त्यांनी पारनेरच्या स्थानिक भुमिपुत्राला संधी मिळत असल्याचे दाखवत विखे पाटलांचा आदेश डावलला. त्यावेळी त्यांनी विखे पाटलांवर टिका देखील केली आणि निलेश लंके यांना विधानसभेवर निवडून आणण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर ते सातत्याने विखे पाटलांच्या विरोधातच राहिले. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढाई झाली. त्यावेळी देखील त्यांनी लंके यांचीच साथ दिली होती. दरम्यान, आता झावरे हे अचानकपणे विखे पाटलांच्या व्यासपीठावर दिसू लागल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
राहुल झावरे यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा!
विखे पाटलांच्या निर्णायक भूमिकेमुळेच नंदकुमार झावरे यांचे चिरंजीव राहुल झावरे यांना पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र, बदलत्या राजकारणात झावरे पिता- पुत्रांनी निलेश लंके यांना साथ दिली. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना नंदकुमार झावरे हे पुन्हा विखे पाटलांच्या व्यासपीठावर दिसू लागल्याने राहुल झावरे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी हे सारे चालू असल्याची चर्चा देखील झडू लागली आहे.