अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील बहुचर्चित असलेल्या नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. डिसेंबर महिन्यात नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
नगर-मनमाड महामार्गाचे काम सुरू झाले, मात्र नंतर ते पुन्हा थंडावल्याने नागरिकांमध्ये पुन्हा नाराजी पसरली आहे. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातात शेकडो प्रवाशांचे बळी गेले आहे. दि. ९ डिसेंबर रोजी दुचाकी व एसटी बसच्या झालेल्या भीषण अपघातात पुन्हा २१ वर्षांच्या युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा नगर-मनमाड रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी तसेच शनी शिंगणापूर येथील शनी महाराजांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील भाविक जात असतात. या भाविकांनाही खराब महामार्गामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
त्यामुळे रखडलेल्या दुरुस्तीसाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेत महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तसेच सावळी विहीर बु. येथील अपूर्ण उड्डाणपुलाचे काम स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यासाठी साकडे घातले