जामखेड । नगर सहयाद्री
गेल्या पाच दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. नुकताच भास्कर मोरेवर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला आहे. शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक, अखिल भारतीय विद्यार्थी परीषद, विद्यार्थी, पालक, पत्रकार यांच्या उपस्थितीत फार्मसी लॅबला सील ठोकले आहे.
पाच दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या शेकडो विद्यार्थ्यांचे भास्कर मोरे विरोधात आंदोलन सुरू आहे. मोरे हे आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास देतात याबाबत तहसीलदार यांना निवेदन दिले होते. व जोपर्यंत विद्यापीठाची समिती येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सत्यशोधन समितीने भेट दिली. यामध्ये अमोल घोलप, डॉ. संदीप पालवे अध्यक्ष, डॉ. डी. वाय दामा या कमिटीच्या सदस्यांनीआंदोलनकर्ते विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, अखिल भारतीय विद्यार्थी परीषद व विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्या बरोबर संवाद साधला.
यावेळी विद्यार्थ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या, त्यानुसार तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार महेश अनारसे, पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या समवेत रत्नदीप मेडिकल कॉलेज मध्ये तपासणी केली गेली. तपासणी मधे अनेक गोष्टी संशयास्पद आढळल्या असल्याचे समितीचे मत आहे.
कॉलेजला कायम प्राचार्य नाहीत, शिक्षक स्टाफ नाही, हजेरी नाही, कागदपत्रे नाहीत ज्या क्लास रूममध्ये क्लास भरतो तेथे अनेक दुसरे क्लासही भरतात, कॉलेज ग्रंथालय, लॅब, कॅटिंग, या ठिकाणी अनेक मटेरियल एक्सपायरी झालेले आढळल्यामुळे कमिटी सदस्यांच्या एकमताने फार्मसी लॅब सह इतर सहा लँबला सील करण्यात आले असून प्राथमिक अहवाल विद्यापीठाला देणार असल्याचे कमिटीने सांगितले.