spot_img
अहमदनगरअखेर ठरलं! सुजय विखेंच्या विरोधात राणी लंके

अखेर ठरलं! सुजय विखेंच्या विरोधात राणी लंके

spot_img

आ. लंके कारवाईला घाबरले | ‘यामुळे’ करावी लागली राणी लंकेंची उमेदवारी अंतिम! मंगळवारपासून जनसंवाद यात्रा

शिवाजी शिर्के | नगर सह्याद्री

लोकसभेच्या नगर मतदारसंघाचा सस्पेंन्स अखेर संपलाय! होळीची धुळवड सुरु असतानाच लोकसभेच्या नगर मतदारसंघातून भाजपा उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार अखेर ठरला. पारनेरचे आमदार निलेश लंके यांना शरद पवार यांच्याकडून आग्रह असताना प्रत्यक्षात मात्र आमदार लंके यांनी तो प्रस्ताव स्वीकारला नाही. या मतदारसंघातून आता त्यांच्या सौभाग्यवती राणीताई लंके यांची उमेदवारी त्यांनी अंतिम केली आहे. या मतदारसंघातून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुजय विखे पाटील यांच्या विरोधात राणीताई लंके या उमेदवार अंतिम झाल्या आहेत. पक्षविरोधी कारवाई टाळण्यासाठी आ. लंके यांनी राणीलंके यांची उमेदवारी केल्याचे मानले जाते. दरम्यान, मंगळवार, दि. १ एप्रिलपासून आ. लंके हे त्यांच्या मित्रमंडळ अथवा प्रतिष्ठानच्या नावाखाली नगर लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क अभियान राबविणार आहे.

भाजपाकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी नसणार आणि ही उमेदवारी बदलणार अशा बातम्या खरं तर पेरल्या जात होत्या आणि त्या बातम्यांचं उगमस्थान कुठं होतं हेही लपून राहिलेले नाही. विखे पाटलांची उमेदवारी तीन महिन्यांपूर्वीच अंतिम झाली होती. त्यामुळेच विखे पिता-पुत्र बिनधास्त होते. दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत जाऊन सत्तेचा फायदा उठविणार्‍या पारनेरच्या आमदार निलेश लंके यांचा पुरता फुटबॉल झाल्याचे लपून राहिले नाही.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लंके दाखल झाले आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली. ते विजयीही झाले. त्यानंतर ते शरद पवार यांचे मानसपुत्र झाल्यागत वावरत राहिले आणि त्यांनी याच संधीचा फायदा उठवला! मतदारसंघात किती आणि कोणती मोठी कामे आणली याबाबत बोलण्याची आज वेळ नाही. मात्र, इतिहासात डोकावून पाहिले तर निलेश लंके हे कायमच स्वत:ला असुरक्षीत समजत आले आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी म्हणजेच साडेचार- पाच वर्षांपूर्वी सुपा जिल्हा परिषद गटात त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या होत्या. निलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही! पुढे जवळपास दीड- दोन वर्षांचा कालावधी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बाकी होता. दस्तुरखुद्द शरद पवार यांना भेटून त्यावेळी याच निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत तालुकाध्यक्ष पोपटराव पवार यांचा मुलगा आणि पंचायत समितीचा माजी उपसभापती दिपक पवार याच्यासाठी त्या सुपा गटातून शिवसेनेच्या चिन्हावर जिल्हा परिषदेत निवडून गेलेल्या त्यांच्या पत्नी व आताच्या लोकसभेच्या उमेदवार राणी लंके यांचा राजीनामा देणार आणि दिपक पवार यांना निवडून आणणार असा जाहीर शब्द दस्तुरखुद्द शरद पवार यांना दिला होता. दिपक पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी निलेश लंके यांच्यासाठी जीवाचे रान केले. पुढे निलेश लंके विधानसभेला निवडून आले. मात्र, जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपला तरी देखील राणी लंके यांनी आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीणामा दिला नाही आणि तो त्यांनी द्यावा असे निलेश लंके यांना देखील वाटले नाही. खरेतर लंके यांनी ज्यांना- ज्यांना असे राजकीय शब्द दिले ते त्यांनी पाळलेतच असे नाही! शिडी म्हणून प्रत्येकाचा कसा आणि कुठे वापर करायचा हे त्यांना लिलया जमत आले आहे. नव्हे … ते त्यात आता चांगलेच माहिर झाले आहेत.

राष्ंट्रवादीत मध्यंतरी फुट पडली आणि अजित पवारांनी बंड केले. या बंडाच्या आदल्या दिवशीपर्यंत शरद पवार यांच्या उजव्या मांडीवर सुप्रिया सुळे आणि डाव्या मांडीवर निलेश लंके असेच काहीसे होते. मात्र, अजित पवार यांनी बंड करताचा याच निलेश लंके यांनी ताडकन मोठ्या पवारांच्या डाव्या मांडीवरुन उडी मारली आणि अजित पवार यांच्या मांडीवर बसणे पसंत केले. मात्र, हे करत असताना दोन्ही पवार आपल्यासाठी देव आहेत असं सांगत सर्वांनाच ते उल्लू बनवत राहिले. मतदारसंघातील कामे मार्गी लागण्यासाठी आपण अजित पवारांसोबत गेल्याचे ते सांगत राहिले. प्रत्यक्षात काल परवा अजित पवार यांची साथ सोडताना त्यांनी त्याच अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत नगरमध्ये विखे पाटलांकडे आपल्याला कसा त्रास होतोय याचा पाढा वाचला!

पुण्यात शरद पवार यांच्यासोबत पुस्तक प्रकाशन कार्यक्रम, त्यानंतर लपून-छपून घेतलेल्या दोन- तीन भेटी आणि अगदी काल नगरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीला लपून लावलेली हजेरी बरीच बोलकी आहे. आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल आणि नाहीच राजीनामा दिला तर आमदारकी म्हणजेच विधानसभा सदस्यत्व अपात्र ठरुन सहा वर्षांसाठी निवडणुकीस अपात्र ठरवले जाणार याबाबत अजित पवार यांनी दिलेला इशारा लपा-छपीच्या मागे असल्याचे उघड आहे.

राणी लंके शिवसेनेकडून आधी जिल्हा परिषदेत निवडून आल्या, त्यानंतर लंके स्वत: राष्ट्रवादीकडून आमदार झाले. खरं तर नैतिकदृष्ट्या आणि लोकप्रियतेचा गाजावाजा करत असलेल्या निलेश लंके यांनी राणी लंके यांचा शिवसेनेचा आणि जिल्हा परिषद सदस्यत्वचा राजीनामा देणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी तसे शेवटपर्यंत केले नाही. सुपा जिल्हा परिषद गटातून पुन्हा आपला सदस्य निवडून येणार नाही याची खात्री त्यांना होती आणि त्यामुळेच त्यांनी आपली झाकली मुठ सव्वालाखाची ठेवली! प्रत्यक्षात राणी लंके यांचा राजीनामा झाला असता तर ती ही झाकली मुठ म्हणजेच सुपा हा त्यांचा स्वत:चा जिल्हा परिषद गट त्यांच्या किती विरोधात आहे हे जनतेसमोर आले असते आणि हेच त्यांना होऊ द्यायचे नव्हते.

आता लोकसभा म्हणजेच दिल्लीला जाण्यास सज्ज झालेल्या निलेश लंके यांनी तीच खेळी खेळली आहे. अजित पवार गटाच्या विरोधात जाऊन हातात तुतारी घेण्याचे धाडस ते करणार नाहीत. ज्यामुळे आमदारकीवर पाणी फेरावे लागेल! याशिवाय सहा वर्षांसाठी अपात्र व्हावे लागेल. त्यामुळेच त्यांनी राणी लंके यांची उमेदवारी अंतिम केली आहे. मात्र, नैतिकेचा विचार केला तर राणी लंके या शरद पवार गटाच्या उमेदवार असणार असतील तर खरंच लोकप्रियतेच्या शिखरावर आपण असल्याचे निलेश लंके व त्यांचे भक्त सांगत असतील तर त्यांनी विधानसभा सदस्यत्वचा राजीनामा दिलाच पाहिजे. मात्र, ते तसे करणार नाहीत! कारण नैतिकता म्हणजचे काय आणि ती कशाशी खातात यासारखी प्रगल्भता त्यांच्यात नाही.

नागपूरमधील काँग्रेस आमदाराने शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी लोकसभेसाठी करताना काँग्रेसच्या सदस्यत्वचा आणि आमदारकीचा राजीनामा फेकला. तसे धाडस निलेश लंके करुच शकत नाही. कारण त्यांना ना लोकसभेत जिंकण्याची शाश्वती आणि विधानसभेबाबत तर न बोललेलच बरं! आता राणी लंके यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचे त्यांनी अंतिम केले आहे. मित्रमंडळाच्या नावाखाली अघवा प्रतिष्ठानच्या नावाखाली येत्या एक तारखेपासून मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढण्याचे त्यांनी नियोजन केले आहे. खांद्यावर तुतारी अथवा जाहीर सभेत तुतारी, राणी लंके यांना निवडून द्या असं ते ज्या क्षणाला बोलतील त्या क्षणाला त्यांची आमदारकी जाणार! म्हणजचे जे करायचं ते आता जाहीरपणे नव्हे तर गुपचूप गाठीभेठी घेत करायचं असं मोठं आव्हान लंके यांच्यासमोर आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमणावरून राडा; नेमका कसा घडला प्रकार पहा…

नगरसेवक पठारेंना पोलीस कोठडी | परस्परविरोधी फिर्याद | पठारेंचे १० लाख चोरले पारनेर | नगर...

पाणीचोरीतील पुणेकरांची दादागिरी थांबेल?; कुकडीसह साकळाई योजना दृष्टीक्षेपात

पाणीदार खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्या सारिपाट / शिवाजी शिर्के मंत्रीमंडळाच्या विस्तारात...

संतोष देशमुख हत्या; बीडमध्ये मोर्चा : फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा; मुंडेंना मंत्रिपदावरून हटवा, कोण काय म्हणाले पहा…

बीड | नगर सह्याद्री बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृण...

तरुणावर धारदार शस्राने वार!; नालेगावात धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर धारदार शस्राने वारकरून जीवे मारण्याचा प्रयत्न...