श्रीगोंदा | नगर सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव, आढळगाव, बेलवंडी कोठार, देऊळगाव, परिसरात वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
कांदा पीक शेतकर्यांचे नगदी पीक मानले जाते परंतु विचित्र हवामान, अवकाळी पाऊस, यामुळे जमिनीतील बुरशीचे प्रमाण वाढले आहे. रोप व लागवड झालेला कांदा अज्ञात रोगाने अचानक पिवळा पडून कांदा रोपाला गोलाकार आळे पिळे पडले असल्यामुळे पीक धोक्यात आले आहे.
शेतकर्यांनी फवारणी देखील केली परंतु ढगाळ वातावरण तसेच दाट धुके यांमुळे कांदा पिके खराब झाली. यावर्षी पोषक हवामान नसल्याने शेतकर्यांना कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
शेतकर्याचे आर्थिक गणित कोलमडणार
५ जानेवारी रोजी तीन एकर कांदा पिकाची लागवड केली होती. बी बियाणे, कांदा रोपे, खते, लागवड, नांगरणी यासाठी आजपर्यंत ८५ ते ९० हजार रुपये खर्च झाला आहे. मात्र वातावरण बदलाने कांदा पिक अचानक पिवळे पडून बुरशी प्रमाण वाढल्याने फवारणीचा खर्च वाढला आहे. वातावरण असेच राहिले तर कांदा पीक सोडून द्यावे लागणार असून शेतकर्याचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.
– शेतकरी सतीश पाडाळे, उमेश पाडाळे