मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला धूर चारत पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा मान मिळवला आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एखत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 50 जागांचाही आकडा गाठता आलेला नाही.
त्यातच, शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या उमेदवारांच्या बैठकीत अनेकांनी पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत शिवसेना युबीटीनेते आणि माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनीही माहिती दिली.
विधानसभा निवडणुका लागल्यामुळे आता पुढील काही महिन्यातच महापालिका निवणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे, येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीत न लढता स्वतंत्र स्वबळावर लढल्या पाहिजेत, अशा प्रकारचा सूर शिवसेना ठाकरे गटातील काही पराभूत उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बोलवलेल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवून फारसा फायदा झाला नसल्याने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा मुद्दा उमेदवारांनी मांडला. पक्षप्रमुखांनी केवळ त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. या चर्चेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.