पारनेर । नगर सहयाद्री-
संगमनेर तालुक्यातील साकूर येथे मनोज गोविंद वाळुंज (वय २८) या तरुणाचा मृतदेह चारचाकी वाहनात आढळून आला आहे. हि घटना मंगळवार दि.१६ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी राजेंद्र वामन (रा शेंडेवाडी,ता संगमनेर ) यांनी दिलेल्या माहिती नुसार घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मनोज वाळुंज हा तरुण पारनेर तालुक्यातील टाकळीढोकेश्वर (मुळ गाव – पळशी) येथील रहिवासी आहे.
तो मांडवेकडून साकूर चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पेंढभाजे वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या चारचाकी वाहन ( क्र एम एच १५, बीएक्स ३४७९) मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता.
त्यानंतर त्याला औषधोपचारासाठी घुलेवाडी येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता औषधोपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. व्ही भुतांबरे करत आहेत.