अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या शिवारातील मारुतीची वाडी या वस्तीवरील बेपत्ता झालेल्या अंगणवाडी सेविका उमा महेश पवार (वय 32, रा. चिचोंडी पाटील, ता.नगर) यांचा मृतदेह तेथून जवळच असलेल्या मेहेकरी नदीच्या पात्रात शुक्रवारी (दि.25) सकाळी 8.30 च्या सुमारास आढळून आला आहे. अंगावरील जखमा पाहता खुन करून मृतदेह नदीत फेकला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या प्रकरणी एका संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
मयत उमा पवार या चिचोंडी पाटील गावच्या शिवारात भातोडी रस्त्यावर मारुतीची वाडी येथे असलेल्या मिनी अंगणवाडीत कार्यरत होत्या. त्या गुरूवारी (दि.24) सकाळी नेहमीप्रमाणे अंगणवाडीत गेल्या मात्र, दुपारी उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. परंतु, त्या कोठेही आढळून आल्या नाहीत. त्यानंतर नातेवाईक व काही ग्रामस्थांनी थेट अंगणवाडीत जावून पाहणी केली असता अंगणवाडीला बाहेरून कुलूप लावले असल्याचे दिसून आले. नातेवाईक व ग्रामस्थांनी अंगणवाडीचे कुलूप तोडले असता अंगणवाडीच्या फरशीवर सर्वत्र सक्ताचा सडा पडलेला होता. तेथे डोक्याचे केस व अंतर्वस्त्र देखील आढळून आले.
फरशीवरून ओढत नेल्याच्या खुणा दिसत होत्या. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी परिसरात पाहणी केली असता घटनास्थळापासून काही अंतरावर काहीतरी ओढत नेल्याच्या खुणा दिसत होत्या. काही अंतरावर परत काही कपडे आढळून आले असल्याने पोलिसांनी श्वान पथकास पाचारण केले होते. श्वानांनी तेथून जवळच असलेल्या मेहेकरी नदी पर्यंत माग दाखवला होता. रात्री उशिरापर्यंत परिसरात उमा पवार अथवा त्यांचा मृतदेह आढळलेला नव्हता.
पोलिसांनी रात्रभर राबविली शोध मोहीम
नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या सह पोलिस पथकांकडून रात्रभर शोध कार्य सुरू होते. पोलिसांची काही पथके संशयितांचाही शोध घेत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली.