फिक्सिंग करणाऱ्या अवलादींना चोपलेच पाहिजे!
सारिपाट / शिवाजी शिर्के
नगर शहरात बऱ्याच कालखंडानंतर पार पडलेली 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही मोठ्या वादामुळे चर्चेत आहे. गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली. ही लढत अतिटतीची सुरू होती. तेव्हा मोहोळच्या एका डावात राक्षे पाठीवर आला अन् पंचांनी राक्षेला थेट बाद घोषित केले. त्यामुळे ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली. पण, शिवराज राक्षेने पंचांच्या निर्णयाला विरोध केला नंतर हा वाद पेटला. या सामन्यात पंच म्हणून काम करणाऱ्या पंचाने राक्षे याची पाठ टेकलेली नसतानाही त्याला पराभूत करताना प्रेक्षकांकडे पाहत एका झटक्यात दिलेला निकाल अनाकलनीय आहे. त्या पंचाने प्रेक्षकांपैकी कोणाकडे तरी पाहून हा निकाल दिला हे लपून राहिलेले नाही. नगरमध्ये या स्पर्धेचं आयोजन आणि ती यशस्वीपणे पार पाडण्यात आ. संग्राम जगताप यांनी अपार मेहनत घेतली. नेटकं नियोजन आणि आयोजन केलेलं असतानाही त्याचं कौतुक होण्याआधी पंचांनी माती खाल्ली आणि त्यातून ही स्पर्धाच वादग्रस्त ठरली. राक्षेला आता बंदी घालण्यात आली असली तरी ज्या पंचाने माती खाल्ली त्याचं काय? शेवटच्या क्षणी व्हीसल वाजवताना तो पंच कोणाकडे पाहत होता आणि त्याने कोणाकडे पाहत निकाल जाहीर केला याचे आत्मचिंतन होणार नसेल तर कुस्त्यांमध्ये सुद्धा फिक्सींग करणाऱ्या अशा अवलादींना मैदानाबाहेर काढून चोपलेच पाहीजे!
सामना संपल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचांची कॉलर धरली आणि त्यानंतर थेट लाथ मारली. आता या घटनेवर आजी-माजी कुस्तीपटू आणि पंचांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी या घटनेवर प्रतिक्रिया मोठी दिली आहे. शिवराज राक्षेने लाथ घातली ही चूक झाली. पण जो कालच्या सामन्यात पंच होता, असल्या पंचाना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणालाय! चंद्रहार चुकीचं काही म्हणाला असे वाटत नाही. मुळात त्या पंचाने माती खाल्ली हे लपून राहिलेले नाही.
खरं तर या स्पर्धेत शिवराजच्या विरोधात लढणाऱ्या पृथ्वीराज मोहोळची काही चूक नाही. मात्र पंचाचा निर्णय वादग्रस्त नक्कीच आहे. शिवराज राक्षेने लाथ मारून चूक केली. पंचाने ज्या पद्धतीने माती खात निर्णय दिला तो पाहता त्याच्या संतापाला त्याने वाट मोकळी करून दिली. चंद्रहार पाटील यावर बोलताना म्हणालाय की, ‘खरं तर शिवराजने पंचाना गोळ्या घालायला पाहिजे होत्या. मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो, त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो’. शिवराज राक्षेचा पराभव आंतरराष्ट्रीय संस्थांनी जर मान्य केला तर एक कोटीचे बक्षीस देईल असं शिवराजचे प्रशिक्षक रणधीर पोंगल यांनी जाहीर केल आहे.
कुस्तीतील जाणकारांपैकी कोणीही पंचांच्या निर्णयाचे समर्थन करताना दिसले नाही. पंचांनी एकत्रीत येत शिवराजवर कारवाई करण्याची मागणी केली आणि आता त्याच्यावर बंदी घालण्यात आली. मात्र, पंचाची भूमिका पार पाडताना कुस्ती खेळणाऱ्या मल्लांवर लक्ष केंद्रीत करण्याचे सोडून प्रेक्षकांकडे पाहत निर्णय जाहीर करणाऱ्या पंचाने माती खाल्ली हे मान्यच केले पाहिजे आणि त्याबदल्यात त्या पंचाला काय काय मिळाले याचीही चौकशी झाली पाहिजे.
फिक्सींग आधीच झाले होते अशी चर्चा सामना संपल्यानंतर सुरू झाली ती त्यामुळेच! एका पंचाच्या माती खाण्याने कुस्तीगीर संघासह साऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहावे लागले. स्पर्धेचे नेटके नियोजन करणाऱ्या आ. संग्राम जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्पर्धेच्या आयोजनातील यशस्वी भूमिकेबद्दल अभिनंदन! मात्र, माती खाऊ पंचाच्या भूमिकेचे काय आणि असे पंच जर असणार असतील चांगल्या खेळाडुंना न्याय मिळेल का हा खरा प्रश्न आहे.