महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
अहमदनगर | नगर सह्याद्री
महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारावेत अशी मागणी महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले कृती समितीने निवेदन दिले. यावेळी कृती समितीचे प्रा.माणिकराव विधाते, अशोकराव कानडे, ज्ञानेश्वर रासकर, आनंद पुंड, मळू गाडळकर, दीपक खेडकर, भरत गारुडकर, ब्रिजेश ताठे आदींसह सदस्य उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, आ. संग्राम जगताप यांच्या संकल्पनेमधून अहमदनगर शहरामध्ये विविध ठिकाणी महामानवांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महापालिकेच्या आवारात बसविण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम प्रोफेसर कॉलनी चौकात सुरु आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा उभारणीच्या कामाचेही भूमिपूजन झाले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु असून या महापुरुषाने गोरगरीब बहुजनांच्या उद्धारासाठी मोठे कार्य केले आहे. त्यामुळे आपणास कृती समितीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे उभारणीबाबत कार्यवाही करावी. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनीही या कामाचे भूमिपूजन लवकरच करू असे आश्वासन दिले.