अहमदनगर। नगर सहयाद्री
सासुरवाडीला निघालेल्या व्यक्तीने रस्त्यात दोन्ही मुलांना विषारी पदार्थ पाजून पत्नीसह गळफास घेतला. विषारी पदार्थ पाजत असताना मुलीने पळ काढल्याने ती बचावली. यात पती पत्नीसह मुलाचा मृत्यू झाला. गजानन रोकडे, पौर्णिमा रोकडे, दुर्वेश रोकडे अशी मृतांची नावे आहेत.
चैताली रोकडे यात बालंबाल बचावली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पारनेर तालुयातील वारणवाडी येथे शुक्रवारी (दि. ५) दुपारी घडली. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली.
गजानन रोकडे, पौर्णिमा रोकडे हे जुन्नर तालुयातील रहिवासी आहेत. रोकडे कुटुंब काल श्रीरामपूर तालुयातील सासूरवाडीला दुचाकीवरून चालले होते. वारणवाडी शिवारात आल्यानंतर दोघा पती-पत्नीत वाद झाले. गजानन याच्याकडे असलेला विषारी पदार्थ त्याने दोन्ही मुलांना पाजला; पण त्याच दरम्यान मुलगी चैतालीने तेथून पळ काढला.
गजानन याने सहा वर्षाच्या मुलाला पाण्यात फेकले व नंतर पत्नी पौर्णिमा हिला गळफास देऊन स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. मुलगी बचावली असल्याने या घटनेचा उलगडा झाला. घटनेची माहिती मिळताच पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.