अहमदनगर। नगर सहयाद्री
वेल्डींगचे काम करताना गॅसचा भडका झाल्याने जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रशांत रामभाऊ गायकवाड (वय ४० रा. लोंढे मळा, केडगाव) असे मयताचे नाव आहे.
केडगाव येथील अनुराज वेल्डींग वर्स येथे ही घटना घडली. या प्रकरणी अनुराज वेल्डींग वर्सचा मालक बिभिसेन सोमनाथ कातखडे याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मयत प्रशांत यांची पत्नी उज्ज्वला प्रशांत गायकवाड (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे.
प्रशांत गायकवाड यांची १३ डिसेंबरला तब्येत ठिक नसतानाही बिभिसेन कातखडे याने त्यांना वारंवार फोन करून अनुराज वेल्डींग वर्स केडगाव येथे गॅस वेल्डींगचे काम करण्यास बोलावून घेतले. प्रशांत तेथे गेल्यानंतर वेल्डींगचे काम करताना गॅसचा भडका झाल्याने त्यात भाजून ते गंभीर जखमी झाले.
त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुणे येथे ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बिभिसेन कातखडे याने प्रशांत यांना कुठल्याही प्रकारची संरक्षणासाठी लागणारी साधने दिली नव्हती. सोमनाथ कातखडे यांच्या हलगर्जीपणामुळे गॅसचा भडका होऊन प्रशांत यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.