spot_img
अहमदनगरउमेदवार ठरविण्यात खा. नीलेश लंकेच किंगमेकर!

उमेदवार ठरविण्यात खा. नीलेश लंकेच किंगमेकर!

spot_img

सारिपाट / शिवाजी शिर्के:-
लोकसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके हे विधानसभा निवडणुकीत नगर लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या सहा जागांवरील महाविकास आघाडीचे उमेदवार ठरविण्यात निर्णायक ठरले आहेत. महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार ठरविताना खा. लंके यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे दिसून येत आहे. राहुरी (प्राजक्त तनपुरे), पारनेर (राणीताई लंके) आणि कर्जत-जामखेड (रोहीत पवार) हे उमेदवार अंतिम झाले असताना नगर शहर, श्रीगोंदा आणि शेवगाव या तीन मतदारसंघातील उमेदवार ठरविण्यात खा. लंके यांचीच भूमिका निर्णायक असणार आहे. त्यामुळेच किंगमेकरच्या भूमिकतेत सध्या तरी खा. लंके हेच दिसून येत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे घमासान होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तिसरी आघाडी या निवडणुकीत दिसणार असली तरी त्याचा फारसा परिणाम नगरच्या जागांवर होईल असे वाटत नाही.

वाडा संस्कृती अन्‌‍ पीए संस्कृतीमुळे प्राजक्त तनपुरेंबद्दल नाराजी!
राहुरी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव अंतिम आहे. त्यांच्या विरोधात जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले हे असणार आहेत. तनपुरे पहिल्याच टर्ममध्ये मामाच्या पुण्याईवर राज्यमंत्री झाले. राज्यमंत्री म्हणून काम करताना त्यांचे मतदारसंघाकडे साफ दुर्लक्ष झाले. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर त्यांनी वाड्यावर बसूनच आपला कारभार चालवला. याशिवाय कर्डिले यांच्या विरोधात जाऊन मागील निवडणुकीत मदत करणाऱ्यांंचा तनपुरे यांनी भ्रमनिरास केला. पीए संस्कृतीमुळे मोठा दगाफटका सुजय विखे यांना बसला. त्याचीच पुनरावृत्ती आता तनपुरे यांच्याबाबत झाल्यास आश्चर्य वाटू नये.

राज्यात चमकणाऱ्या रोहीत पवारांची वाट बिकटच!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांच्यासाठी सावलीसारखे सोबत दिसणारे रोहीत पवार हे राज्यातील विविध प्रश्नांवर महायुतीच्या नेत्यांना जाब विचारताना दिसत आहेत. मात्र, त्याचवेळी कर्जत- जामखेडमधील जनता आणि त्यांचे स्थानिक प्रश्न याकडे त्यांचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसते. सोशल मिडियाची हवा आता थेट रोहीत पवार यांच्याच डोक्यात गेल्याचे दिसते. राज्याच्या विविध प्रश्नांवर मिडीयासमोर बोलणारे रोहीत पवार मतदारसंघात लक्ष घालतील का असा थेट सवाल दोन्ही तालुक्यातील जनता उपस्थित करत आहे. सुजय विखेंच्या पराभवास कारणीभूत ठरलेले पीए हेच आता रोहीत पवार यांच्या पराभवास कारणीभूत ठरणार असल्याचे दिसून येते. मतदारसंघात अभावानेच दिसणारे रोहीत पवार आता कर्जत-जामखेडकरांना नकोसे का वाटू लागलेत याचा शोध रोहीत पवार यांना घ्यावा लागणार आहे.

प्रताप ढाकणेंपेक्षा पसंती चंद्रशेखर घुलेंना!
शेवगाव- पाथड मतदारसंघातून भाजपाने मानिका राजीव राजळे यांचे नाव जाहीर केले. महाविकास आघाडीकडून येथे प्रताप ढाकणे यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय हर्षदाताई काकडे यांनीही कंबर कसली आहे. मात्र, त्याच जोडीने माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी यावेळी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक करायचीच असा चंग बांधला आहे. ढाकणे आणि घुले यांच्यात तुलना केली तर जातीय समिकरणांवर ढाकणे यांची नजर आहे तर जातीच्या भिंती ओलांडून आपल्याला यावेळी सारेच मदत करतील अशी भावना चंद्रशेखर घुले यांच्यात आहे. चंद्रशेखर घुले यांना मतदारसंघात मोठी सहानुभूती असल्याचे दिसून येते. ढाकणे यांच्यापेक्षा चंद्रशेखर घुले यांना दोन्ही तालुक्यातील मतदारांकडून पसंती असल्याचे दिसून येत आहे. खा. नीलेश लंके यांनी या मतदारसंघात आपली भूमिका ही प्रताप ढाकणे यांच्यासाठी कायम ठेवली आहे.

श्रीगोंद्यात राहुल जगतापच तरीही का आहे सस्पेंन्स?
श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडेच असून येथून राहुल जगताप हेच आमचे उमेदवार असल्याचे पक्षाचे नेते शरद पवार यांच्यापासून जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी जाहीर केले. मात्र, ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी संजय राऊत हे प्रयत्नशिल आहेत. सुरुवातीला साजन पाचपुते यांच्यासाठी राऊत आग्रही होते. आता त्यांना नागवडे यांच्यासाठी ही जागा हवी असल्याची चर्चा आहे. मात्र, शरद पवार यांच्याकडून राहुल जगताप यांचे नाव अंतिम मानले जात आहे. नागवडे यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यास त्यांचा काँग्रेस-भाजपा- राष्ट्रवादी अजित पवार गट आणि आता शिवसेना असा राजकीय प्रवास पूर्ण होईल. मात्र, असे असले तरी नागवडे यांच्या दलबदलू भूमिकेबद्दल चर्चा झडत आहेत.

राणीताई लंके यांची संपूर्ण भिस्त नगर शहरातील उमेदवारीवर!
नगर शहरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यावर नगर शहरात उत्सुकता असली तरी त्यावरच पारनेरमधील महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई लंके यांचे समिकरण अवलंबून आहे. नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट हे पारनेरला जोडलेले आहेत. या दोन गटांमधून पाच वर्षापूव नीलेश लंके यांना मोठे मताधिक्य होते. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही गटातून हे मताधिक्य अवघे पाच हजार असल्याचे समोर आले. याचाच अर्थ लंके यांच्या विरोधात नगर तालुक्यात वातावरण तयार झाले आहे. नगर शहरात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून प्रा. शशिकांत गाडे आणि संदीप कोतकर यांची नावे चर्चेत आली आहेत. या दोघांचाही नगर तालुक्यातील पारनेरला जोडलेल्या दोन्ही जिल्हा परिषद गटात मोठा संपर्क आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळावी यासाठी खा. लंके हे प्रयत्नशिल असल्याचे बोलले जाते. गाडे यांच्यापेक्षा कोतकर यांना उमेदवारी दिल्यास या दोन्ही गटात कोतकर यांचे समर्थक मोठे आहेत आणि त्यातून त्यांची मते आपोआपच लंके यांना मिळू शकतात. नगर शहरात उमेदवारी मिळवून देताना तिकडे पारनेरमध्ये बेरीज करण्याची रणनिती खा. लंके यांनी आखल्याचे यातून समोर येत आहे.

संदीप कोतकर यांची उमेदवारी पचणार का?
लोहा, लोहे को काटता है; या युक्तीनुसार नगर शहरात विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात संदीप कोतकर हेच योग्य उमेदवार असल्याची चर्चा झडत आहे. जगताप यांना कोतकर हेच फाईट करु शकतात असे बोलले जात असले तरी प्राबल्य असणाऱ्या नगर शहरात शिवसेनेचा कायम संघर्ष झाला तो कोतकर यांच्याच विरोधात! आता त्याच कोतकर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी दिल्यास शिवसैनिकांना ते पचनी पडेल का असा प्रश्न आहे. जगताप यांच्यासमोर कोतकर हे तगडे आव्हान निर्माण करू शकतात. मात्र, कोतकर यांना सर्वांची साथ मिळणार किंवा कसे यावरच बरेच काही अवलंबून आहे. कोतकर यांच्या उमेदवारीसाठी खा. लंके हेही अनुकूल असल्याचे बोलले जाते. खा. लंके यांना यातून एकाच दगडात दोन पक्षी मारायचे आहेत! संग्राम जगताप यांच्या विरोधात थेट आव्हान देणे आणि दुसरे म्हणजे स्वत:च्या पारनेर मतदारसंघात कोतकर यांची मदत घेणे! अर्थात हे वरकरणी दिसते तसे सोपे नाही.

बबनराव पाचपुते फडणवीसांच्या भेटीला
भाजपने 99 विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. प्रतिभा बबनराव पाचपुते यांना पक्षाने श्रीगोंद्यातून उमेदवारी जाहीर केली असताना त्यात बदल करून विक्रमसिंह पाचपुते यांना ही उमेदवारी मिळावी अशी मागणी बबनराव पाचपुते यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पाचपुते हे मुंबईतील सागर निवासस्थानी दाखल झाले आहेत. भाजपा श्रेष्ठी यात बदल करतात किंवा कसे हे आता पहावे लागणार आहे.

पक्ष धृतराष्ट्रासारखा झाल्याचा सुवर्णा पाचपुतेंचा आरोप
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून पक्षात आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी देत आहे. पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे, असं म्हणत पाचपुते यांनी पक्षावर जोरदार टीका केली. सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवले आहे. मात्र, भाजपचे चिन्ह कार्यालयातून हटवताना त्यांना भरून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षाला माझी ताकद दाखवून देण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

तुतारीच्या पहिल्या यादीत राणी लंकेंसह नगरमधील पाच जण
भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांची संभाव्य उमेदवारांची नावे फायनल झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे 39 शिलेदार विधानसभा निवडणुकीची खिंड लढवण्यास सज्ज झाले आहे. सर्वांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकृत उमेदवारी यादी कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत नगर जिल्ह्यातून रोहित पवार – कर्जत जामखेड, प्राजक्त तनपुरे – राहुरी, राणीताई लंके – पारनेर, अमित भांगरे – अकोले, प्रतापराव ढाकणे – पाथड यांची नावे असल्याचे समोर आले आहे.

राहुरीत शिवाजीराव कर्डिलेंच्या अडचणी वाढणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपबरोबर एकनिष्ठ असलेले सत्यजित कदम यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याविरोधात बंडाचा इशारा दिला आहे. भाजपने उमेदवारांची रविवारी पहिली यादी जाहीर करताच, माजी आमदार चंद्रशेखर कदम आणि त्यांचे चिंरजीव सत्यजित कदम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. गेल्यावेळेस उमेदवारी मागितली होती. त्यावेळी पुढच्या वेळी नक्की उमेदवारी देणार, असे सांगून थांबवले. आता तसं होणार नाही. माझ्याबरोबर कार्यकर्त्यांची फौज आहे, कार्यकर्ते म्हणतील, तेच राहुरी मतदार संघात होईल, असा इशारा सत्यजित कदम यांनी दिला. सत्यजित कदम दोन दिवसांनी निर्णय घेणार असल्याचे सांगितले जाते. कार्यकर्ते काय सांगतील त्याप्रमाणे निर्णय होईल. सत्यजित व त्याच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य असेल व त्याला माझा पाठिंबा असेल, असे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी सांगितले आहे.

बाळासाहेब मुरकुटे यांच्या दुटप्पी भूमिकेने भाजपासह राष्ट्रवादीत संताप!
नेवासा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांची उमेदवारी अंतिम आहे. महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेली आहे. भाजपाचे इच्छुक उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांनी येथून गडाख यांच्या विरोधात लढण्याची तयारी चालवली आहे. अजित पवार यांची त्यांनी नुकतीच भेट घेतली आणि ही जागा राष्ट्रवादीकडे घेण्याची आणि त्यासाठी आपण भाजपामधून बाहेर पडण्यास तयार असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या समर्थकांनी मुरकुटे यांच्या संभाव्य उमेदवारीस लागलीच विरोध केला. याशिवाय भाजपाच्या निष्ठावान गटानेही मुरकुटे यांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी अंतिम झालेल्या मित्राने याच मुरकुटे यांना आमदार करण्यात मोठी भूमिका बजावली होती. आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली असताना मुरकुटे हे त्यांना विरोध करण्यास निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कृषिनाथ कारखान्याने ऊस उत्पादकांना न्याय दिला; पद्मश्री पवार

खा. नीलेश लंके, पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाणपूजन...

मोठी बातमी! राजकीय घडामोडींना वेग; एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे यांच्या सोबत गुप्त बैठक

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागली असून राजकारणात घडामोडींना वेग आला...

ब्रेकिंग! नगरच्या राजकारणात ट्विस्ट!; सत्यजित तांबे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकिय चर्चांना उधाण…

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागली आहे. भाजपने ९९ उमेदवारांची घोषणा...

अल्पवयीन मुलावर धारदार शस्राने सपासप वार!; बारातोंटी कारंजा जवळ नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- तिघांनी अल्पवयीन मुलावर (वय 17) धारदार वस्तूने वार करून त्याला...