spot_img
ब्रेकिंगराजकारणात पुन्हा भूकंप..? शरद पवार यांच्या गटातील 'बडा' नेता रामराम ठोकणार

राजकारणात पुन्हा भूकंप..? शरद पवार यांच्या गटातील ‘बडा’ नेता रामराम ठोकणार

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री-
राज्याच्या राजकारणात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील पक्षांना मोठी गळती लागली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे बडे नेते मिलिंद देवरा, काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्षातून बाहेर पडले. आता भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या मोठ्या हालचाली असून त्या नेत्याचा पक्षप्रवेश लवकरच होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा दणका देण्याची तयारी भाजपने केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी ४२ हून अधिक जागा जिंकायच्या असतील तर या दोन पक्षांतील महत्त्वाचे आणि मोठे नेते आपल्यासोबत आले पाहिजेत, अशी भाजपची भूमिका असल्याचे समजते.

पश्चिम महाराष्ट्रात आजवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. गेल्या काही वर्षांत भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे आव्हान देत आपली जागा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अद्याप भाजप पश्चिम महाराष्ट्रात मजबुतीने पाय रोवू शकला नाही. त्यामुळे भाजपने या भागातील नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादीतील बंडात शरद पवार यांना आजवर साथ दिलेला हा नेता अजित पवार यांच्यासोबत जाणार, मंत्रिमंडळात त्यांना महत्त्वाचे खाते देणार अशा बातम्या मध्यंतरी होत्या, पण त्या नेत्याने हे वृत्त फेटाळले आहे.

शरद पवार गटातील हा नेता जर भाजपसोबत आला तर भाजपला सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत वर्चस्व निर्माण करता येईल. दीर्घकाळ राज्यातील महत्त्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव असलेल्या या नेत्याचे सहकार क्षेत्रातही मोठे नाव आहे.या नेत्याची राज्यातील भाजपच्या एका बड्या नेत्यासोबत आणि दिल्लीतील एका नेत्यासोबत भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या नेत्याला भाजपमध्ये आणून त्यांच्या मुलाला लोकसभेची उमेदवारी द्यायची किंवा त्या नेत्यालाच लोकसभेला उभे करायचे, या दोन्ही पर्यायांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक महत्त्वाचे नेते आणि शरद पवार यांचे खास म्हणून या नेत्याचे महत्त्व पक्षात कायम राहिले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे नांदेड, परभणी, हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघांत मोठा फायदा होईल. लोकसभेच्या जागावाटपात नेहमीच शिवसेनेला मराठवाड्यात अधिक जागा मिळाल्या. शिवसेनेतील फुटीनंतर आता स्वत:ची ताकद मराठवाड्यात वाढविली पाहिजे, या भूमिकेतूनच चव्हाण यांना सोबत घेतले गेले. असे असले तरी जागावाटप कसे होणार, हा नवा विषय आहे अन् सगळेच नवे असल्याने तो नव्यानेच सोडवावा लागणार आहे. सत्ताधारी युतीत मोदी या नावाभोवती सगळे केंद्रित झाल्याने सूत्र स्पष्ट आहे. शिंदे गटाचे किती खासदार यावेळी जिंकून येऊ शकतात, याचे भाजपने काही कोष्टक तयार केले असेल. ते सांगून तसे बदल करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाईल. ते बदल प्रत्यक्षात आणले जातील. शिंदे गट यथाशक्ती विरोध करुन पाहील; पण त्यामुळे फार काही पदरी पडेल असे नाही.

तो नेता कोण?
पश्चिम महाराष्ट्रातील, शरद पवार यांच्या अत्यंत जवळ असलेला नेता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असली तरी तो नेता कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे साहजिकच ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे नाव पुढे येत आहे. गेल्या काही दिवसांत जयंत पाटील यांनी भाजपवर फार आक्रमक टीका देखील केलेली नाही. राज्याचे मंत्री दिपक केसरकर यांनी देखील थेट नाव घेत ‘जयंत पाटील मोठे नेते आहेत, त्यांनी कुठे जायचे हा त्यांचा प्रश्न आहे’ असे म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा आणखी वाढविली आहे.

 चर्चा होऊद्यात- पण मी कुठेही जाणार नाही
जयंत पाटील मुंबईमधल्या फोर्टच्या बॅलार्ड इस्टेट येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आले होते. तेथे पक्षाचे अनेक कार्यकर्ते नेते पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या दिशेने बोट दाखवून या सगळ्यांना विचारा मी भाजपमध्ये जाणार आहे का? चर्चा होऊद्यात- पण मी कुठेही जाणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले. तुमच्या भाजपप्रवेशाची चर्चा आज सकाळपासून होते आहे. या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर जयंत पाटील म्हणाले, कोणीही कुठे जाणार नाही आणि येणार नाही. माझ्या नावाची चर्चा आहे तर चांगलंय ना… तुम्ही सगळ्या माध्यमांनी मला प्रसिद्धी द्या. प्रसिद्धी मिळाल्याशिवाय लोकांच्यासमोर जाण्याची संधी राहिलेली नाही.

याचा अर्थ आमच्याकडे टॅलेंट आहे : सुप्रिया सुळे
विरोधी पक्षातील नेत्यांची भारतीय जनता पक्षात जाण्यासंबंधी चर्चा रोज होत असते. त्यांच्याकडे ३०० पेक्षा जास्त खासदार असले आणि १०० पेक्षा जास्त आमदार असले तरी त्यांना विरोधी पक्षातलेच लोक हवे असतात. म्हणजे साहजिक आमच्याकडे टॅलेंट आहे, असे सांगताना जयंत पाटील यांच्या भाजपप्रवेशाची चर्चांचं सुप्रिया सुळे यांनी खंडन केलं.

तर आमच्याकडे त्यांचं स्वागत आहे : बावनकुळे
पुढच्या काळात राजकारणात काहीच सांगता येत नाही. रोज राजकारण बदलत असतं. रोज विचार बदलत असतात लोकांचे. त्यामुळे मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी आणि आमच्या विचारधारेवर कुणी काम करायला तयार असेल, तर आमच्याकडे स्वागत आहे, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वरील उत्तर दिलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पैसा झाला खोटा, घोटाळा झाला मोठा जादा परताव्याचे आमिष ; अहिल्यानगरकरांचे करोडो रुपये लुटले

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जादा परताव्याचे आमिष, महिनाभरात पैसे डबल करण्याचे आमिष दाखवत जादा...

‌‘एपीएमसी‌’ मार्केट नवी मुंबईतून हद्दपार?, वाचा कारण..

नवी मुंबई | नगर सह्याद्री मुंबईतील वाढती लोकवस्ती, वाहतुकीचे प्रश्न आणि जागेची अनुपलब्धता या कारणांसाठी...

भयंकर अपघात: रेल्वेची क्रॉसिंग पॉईटवर शाळेच्या बसला जोरदार धडक, अनेक चिमुकले..

Railway Crossing Accident: तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यातील सेम्मानगुप्पम भागात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला....

बावडी शिवारात धक्कादायक प्रकार; चार आरोपींना तात्काळ अटक!, नेमकं काय घडलं?

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- तालुक्यातील बावडी शिवारात गायी व गोऱ्यांची वाहतूक करणाऱ्या मजुरावर चार...