सध्या सुपातील काही पतसंस्था कधी जातील सांगता येत नाही; प्रामाणिक संचालकांत अस्वस्थता
शरद झावरे | नगर सह्याद्री
नगर जिल्ह्यातील व पारनेर तालुयातील बहुचर्चित संपदा पतसंस्थेचा निकाल जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी जाहीर केला असून यामध्ये पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर १२ जणांना कमी जास्त प्रमाणात शिक्षा व दंड सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे या निकालामुळे व शिक्षेमुळे सध्या पारनेर तालुयातील सहकारी पतसंस्था व मल्टिस्टेट पतसंस्थांमध्ये जी अनागोंदी सुरू आहे त्याला निश्चितच चाप बसणार असल्याची प्रतिक्रिया येऊ लागली आहे.
दुसरीकडे अनेक निष्पाप संचालक यामध्ये भरडले गेले असून त्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया सुद्धा नातेवाईकातून व्यक्त होऊ लागली आहे. तेव्हा संपदा पतसंस्थेचा धडा पारनेर तालुयातील इतर पतसंस्था चालक घेणार का असाही सवाल केला जाऊ लागला आहे. पारनेर तालुका व नगर जिल्हा हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखले जातात. अनेक राज्य जिल्हा तालुका गट गाव कार्यक्षेत्र असलेल्या पतसंस्थांनी चांगला नावलौकिक मिळविला. परंतु कान्हूर पठार जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य व कम्युनिस्ट पक्षाचे नेते आझाद ठुबे यांच्या राजे शिवाजी पतसंस्थेत तालुयातील काही प्रमुख पतसंस्था व ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत.
त्यामुळे या एका पतसंस्थेमुळे अजूनही तीन ते चार पतसंस्था अडचणीत आल्या असून पतसंस्था चळवळ बदनाम होताना दिसून येत आहे. अनेक ठेवीदारांनी आपल्या जीवनाची पुंजी अशा पतसंस्थांमध्ये टाकली असून हक्काचे पैसेच मिळत नसल्याने ठेवीदार पुन्हा एकदा सैरभैर झालेले आहे. त्यामुळे एकंदरीत पतसंस्था क्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले असताना संपदा पतसंस्थेचा निकाल जिल्हा न्यायालयाने जाहीर केल्याने ठेवीदारांच्या आशा उंचावल्या आहेत. पतसंस्था चालकांचे धाबे या निकालाने निश्चित दणाणले आहे.
‘संपदा’तून धडा घेणार का?
पारनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यात संपदा पतसंस्थेचा नावलौकिक हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी मानला जात होता. महिलांसाठी ‘नारी धनसंपदा’ हा राज्यामध्ये रोल मॉडेल ठरू पाहत होता. परंतु ज्ञानदेव वाफारे यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळाने महाघोटाळे केले. १३ वर्षांच्या कार्यकाळानंतर ज्ञानदेव वाफारेंसह इतर १७ संचालकांना न्यायालयाने दोषी धरून शिक्षा सुनावली आहे. पारनेर तालुयातील आजही अनेक पतसंस्थांमधील महाघोटाळे उघड झाले असून त्यांना यानिमित्ताने सावरण्यासाठी संधी उपलब्ध झालेली आहे. ‘संपदा’च्या निकालातून ते धडा घेणार का? असे विचारले जाऊ लागले आहे.
अंडे खा कोंबडी नका खाऊ
सहकार क्षेत्रात पतसंस्था व मल्टिस्टेट पतसंस्था या अनेक लोकांसाठी चराऊ कुरण झाल्या आहेत. ‘जो तळे राखणार तो पाणी चाखणार’ ही म्हण यांच्या बाबतीत काही अंशी बरोबर ठरली आहे. पतसंस्थांतील ठेवी आपल्या नसून सर्वसामान्य व गोरगरिबांच्या आहे हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे पतसंस्थेचा कारभार करीत असताना मिळणार्या उत्पन्नातूनच खर्च किंवा इतर गोष्टी कराव्यात. दुसरीकडे पतसंस्था चालकांनी पतसंस्था ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असून ‘फक्त अंडे खावे कोंबडी कापून खाऊ नये’ अशी बोलकी प्रतिक्रिया आता ठेवीदारांतून व सर्वसामान्यांतून व्यक्त होऊ लागली आहे.
टक्केवारीतून अनेकांचे उखळ पांढरे
पारनेर तालुयातील अनेक पतसंस्था आर्थिक अडचणीत आल्या असून अनेक गोरगरीब व गरजूंवर आपल्या ठेवी मिळविण्यासाठी पतसंस्थेच्या दरात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. आपली जमापुंजी ठेव म्हणून ठेवले असता ती परत मिळविण्यासाठी भीक मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या आर्थिक घडामोडींमध्ये अनेक कर्मचार्यांनी ठेवी मिळवून देण्यासाठी टक्केवारी घेत उखळ पांढरे करून घेतले आहे.
आलिशान गाड्या व कमिशनही
पारनेर तालुयातील अनेक मोठमोठ्या पतसंस्थांच्या माध्यमातून कर्ज प्रकरणे मंजूर करून घेत या पतसंस्था चालकांना आलिशान गाड्या व घसघशीत कमिशन ढवळे नावाच्या व्यक्तीने दिले असल्याची चर्चा जोरात आहे. त्यामुळे पारनेर तालुयातील ज्या चार ते पाच पतसंस्था आर्थिक अडचणीत आल्या आहेत, त्याचा केंद्रबिंदू ढवळे असून या आलिशान गाड्यांचे व कमिशनचे लाभार्थी कोण याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. तर दुसरीकडे पैसे मिळत नसल्याने काही ठेवीदारांनी थेट या आलिशान गाड्या ओढून नेण्याचा इशारा पण दिला आहे.