अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मिरजगाव (ता. कर्जत) येथे 10 जानेवारी रोजी एका 35-40 वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक केली आहे. पत्नीने प्रियकर व भावाच्या मदतीने ‘नाजूक’ संबंधात अडसर ठरणार्या पतीचा काटा काढल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे बेवारस आढळलेल्या मृतदेहाचे कोडे उलगडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. संतोष शिवाजी काळे (वय 44, रा. पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे), प्रवीण प्रल्हाद जाधव (वय 33, रा. सिंगर ता. डिग्रस, जि. यवतमाळ), ललिता दत्तात्रय राठोड (वय 25, रा. जमशदपूर, ता. पुसद, जि. यवतमाळ) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी: संतोष काळे हा 1 जानेवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ललिताकडे आला होता. त्यावेळी तिचा पती दत्तात्रय तेथे होता. त्यांच्यात वाद होऊन दत्तात्रयने पत्नी ललिता हिला मारहाण केली. त्यावेळी ललिता, संतोष, प्रवीण यांनी मिळून दत्तात्रय यास मारहाण करून त्याचा गळा दोरीने आवळून त्यास जीवे ठार मारले. दुसर्या दिवशी संतोषने त्याच्याकडील चारचाकी वाहनाने मृतदेह प्रवीणच्या मदतीने मिरजगाव परिसरातील एका शेतातील खड्ड्यात टाकला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून दगडाने ठेचून चेहरा विद्रुप केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक विश्लेषणातून हा गुन्हा संशयित आरोपी संतोष काळे याने त्याच्या साथीदारांसह केला असून तो इंदापूर, पुणे येथे असल्याचे तपासात पुढे आले. त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचे ललिता सोबत ‘नाजूक’ संबंध होते. याला पती दत्तात्रय हा विरोध करत होता.यामुळे संतोष, ललिता व तिचा भाऊ प्रवीण जाधव यांनी मिळून दत्तात्रयला गळा आवळून जीवे ठार मारले असल्याचे तपासात पुढे आले.