spot_img
अहमदनगरनडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

spot_img

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार!
सारिपाट / शिवाजी शिर्के
प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा प्रसिद्ध होऊन समोर येताच शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस या दोन्ही राजकीय पक्षांची विकेट गेल्याचेच समोर आले आहे. तयार झालेले प्रभाग आणि त्यातील वर्चस्व याचा विचार केला तर या दोन्ही राजकीय पक्षांना 17 प्रभागांमधून 68 उमेदवार मिळतील की नाही अशी परिस्थिती सध्यातरी दिसून येत आहे. शहराच्या मध्यवत भागावर शिवसेनेचे वर्चस्व राहायचे. मात्र, शहराचा मध्यवत भाग तोडून आजूबाजूच्या चार- पाच प्रभागांना जोडला गेलाय. झेंडीगेट हा मुस्लिमबहुल भाग देखील तीन प्रभागांमध्ये तोडून टाकला गेलाय. मुकुंदनगरमध्ये तोडफोड झाली नसल्याचे वरकरणी दिसत असले तरी हे मुद्दामच ठेवल्याचे लपून राहिलेले नाही. शिवसेना शिंदे गटाचे शहरात नेतृत्व करणाऱ्यांचे प्रभाग काहीसे सोयीचे वाटत असले तरी यातील एक- दोघांचा अपवाद केला तर बाकींच्यांची विकेट आत्ताच निघाल्याचे मानले जाते. काँग्रेसची अवस्था तर अतिशय बिकट झाली असल्याचे दिप चव्हाण यांचा प्रभागातूनच समोर आले आहे. विक्रम राठोड आणि योगीराज गाडे यांची अवस्था तर त्याहून बिकट झालीय! लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सोबत असल्याचे दाखवून विरोधी काम केलेल्यांची अवस्था तर ‌‘ना घर का ना घाट का‌’, अशीच झाल्याचे मानले जाते. यातील काहींचा ठरवून कार्यक्रम होणार हेही नक्की!

माजी महापौर संदीप कोतकर यांच्या भूमिकेकडे लक्ष!
केडगाव हा संदीप कोतकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. याशिवाय शहरात त्यांना माननारा वर्ग आहेच. मनपा निवडणुकीच्या निमित्ताने ते आपली राजकीय ताकद दाखवून देणार हे नक्की! विधानसभा निवडणुकीच्यावेळीच त्यांनी चाचपणी केली होती. मात्र, त्यांनी त्यावेळी थांबण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यांपासून सचिन कोतकर हे नगर शहरात संघटनात्मक बांधणी करताना दिसतात. याचाच अर्थ मनपा निवडणुकीच्या निमित्ताने कोतकर कुटुंब आपले राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखीत करणार हे नक्की.

जुन्या भाजपा कार्यकर्त्यांना ‌‘इलेक्टिंग मेरीट‌’ येऊ शकते आडवे!
महायुती म्हणून एकत्रीत लढले किंवा स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला तरी नगर शहरात डॉ. सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांची सहमती एक्सप्रेेस निर्णायक ठरणार आहे. राष्ट्रवादीचे अंतिम अधिकार संग्राम जगताप यांच्याकडेच असणार आहेत. मात्र, भाजपाचे अधिकार कोणाकडे असणार? जुन्याजाणत्या भाजपा कार्यकर्त्यांचा एक गट नगर शहरात आहे. त्यांची भूमिका काय असणार हेही समोर येणार आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये ‌‘इलेक्टींग मेरीट‌’ लावून विखे पाटील उमेदवार देणार हे नक्की! हेच इलेक्टींग मेरीट भाजपातील जुन्या नेत्यांना पचणी पडणार का हे पहावे लागणार आहे.

कडव्या हिंदुत्वाच्या भूमिकेनंतरची पहिली निवडणूक
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेत मुुुस्लिम समाजाला थेट अंगावर घेणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर भगवी टोपी आणि भगवी शाल घेऊन थेट मैदानात उतरणाऱ्या जगताप यांची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळेच ते ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करणार यात शंका नाही. झेंडीगेट परिसराचे केले गेलेले चार तुकडे आणि मुकुंदनगरमध्ये आपसात लावली जाणारी झुंज बरीच बोलकी ठरली आहे.

त्यांच्या वाट्याला अत्यंत भयानक वेदना येणार
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हमखास आपल्यासोबत असणार असे ज्यांना गृहीत धरले त्यांनी दगाफटका केला. त्या दगाफटका करणाऱ्यांनी ‌‘तो मी नव्हेच‌’ ही भूमिका अलिकडच्या काही दिवसात घेतली असली तरी त्यांच्या वाट्याला अत्यंत भयानक अशा वेदना येणार असल्याची झलक प्रभाग रचनेच्या प्रारुपमधून स्पष्टपणे समोर आली आहे. सुजय विखे – संग्राम जगताप ही जोडी राजकीय बदला घेण्याच्या मुडमध्ये असल्याचे लपून राहिलेले नाही.

‌‘त्यांच्या‌’सह दगाबाजी करणाऱ्या स्वकीयांचाही बाजार उठणार!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी करुन लढण्याचा निर्णय अद्यापतरी झालेला नाही. स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले गेल्यास नगरमध्ये सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांची सहमती एक्सप्रेस सुसाट धावणार हे नक्की! त्यातून अनेकांच्या दांड्या गुल होणार हेही नक्की! त्यात विरोधकांचा जसा बाजार उठवला जाणार तसाच बाजार उठवला जाणार तो दगाबाजी करणाऱ्या स्वकीयांचाही!

राष्ट्रवादीसाठी सबकुछ अलबेल!
राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार यादी संग्राम जगताप हेच अंतिम करणार यात शंका नाही. त्यांच्याकडील प्रमुख संभाव्य उमेदवारांपैकी गणेश भोसले, अविनाश घुले, संपत बारस्कर यांचे प्रभाग सुरक्षीत झाले आहेत. त्यांच्या प्रभागांची फारशी तोडफोड देखील झालेली नाही. मुकुंदनगरचा अपवाद वगळता अन्य प्रभाग रचना पाहता राष्ट्रवादीसाठी सबकुछ अलबेल असल्याचे मानले जात आहे.

शिवसेनेचे अनिल शिंदेच सेफ झोनमध्ये; बाकीचे?
ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांपैकी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्यासाठी सध्याची प्रभाग रचना सेफ मानली जाते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनिल शिंदे यांनी घेतलेली मदतीची भूमिका आता त्यांना तारणारी ठरली हे नक्की! सचिन जाधव, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, दिलीप सातपुते या चौघांना कडवी झुंज द्यावी लागणार हे नक्की! लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोणी काय मोहीम राबवली याची जंत्री घेऊनच सुजय विखे हे स्वत: बसणार असल्याने उमेदवारी केल्यानंतरही त्यांच्यासमोर आव्हान असणार हे नक्की!

बाबासाहेब वाकळे, अनिल बोरुडे एकत्र लढणार
नव्या प्रभाग रचनेत माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांचा हक्काचा भाग तोडला गेल्याचे दिसत असले आणि त्यातून ते अडचणीत आल्याचे बोलले जात असले तरी त्यात तथ्यांश वाटत नाही. अनिल बोरुडे यांनी सुजय विखे पाटलांशी साधलेली जवळीक आणि विखे पाटलांकडून बोरुडे यांना केली जाणारी मदत पाहता बोरुडे हे सेफझोनमध्ये मानले जात आहेत. बाबासाहेब वाकळे आणि अनिल बोरुडे हे दोघेही एकाच प्रभागातून कमळाच्या चिन्हावर दिसल्यास आश्चर्य वाटू नये.

योगीराज गाडेंसह विक्रम राठोड यांनाही घेरले!
शिवसेना ठाकरे गटाचे योगीराज गाडे आणि विक्रम राठोड हे दोन तरुण चेहरे! दोघांनाही कौटुंबिक राजकीय वारसा! योगीराज गाडे हे शिवसेनेत असले तरी गेल्या वर्षभरापासून ते राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना हूजेरी लावताना दिसतात. खा. निलेश लंके यांच्याशी त्यांनी जवळीक साधली आहे. तसेच काहीसे विक्रम राठोड यांच्याही बाबत आहे. या दोघांनाही आता यावेळी प्रभाग शोधण्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. विखे अन्‌‍ जगताप या दोघांंनीही ज्यांचा ज्यांचा राजकीय कार्यक्रम ठरवला असेल त्यात या दोघांचा वरचा क्रमांक असणार हे नक्की!

दिलीप सातपुते असणार दोघांच्याही रडारवर!
लोकसभा निवडणुकीत सोबत असल्याचे दाखवून दिलीप सातपुते यांनी जाहीरपणे विरोधी काम केल्याची नोंद विखे पाटलांकडे आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीत आणि त्याआधीपासून सातपुते हे कायमच संग्राम जगताप यांच्या विरोधात भूमिका घेत आले आहेत. आता ते महायुतीत असले तरीही त्यांना या निवडणुकीत थोपवण्यासाठी विखे- जगताप यांच्याकडून प्रयत्न होणार!

निखिल वारे, धनंजय जाधव हे विखे-जगतापांच्या गुडबुकमध्ये!
डॉ. सुजय विखे पाटील आणि आ. संग्राम जगताप या दोघांशीही अतिशय जवळचे संबंध जपणाऱ्यांमध्ये निखील वारे आणि धनंजय जाधव यांचा वरचा क्रमांक लागतो. मागील निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला. काँग्रेसमधून निवडून आले असतानाही त्यांच्यासाठी विखे- जगताप यांचेच आदेश महत्वाचे होते. दोघांच्याही गुडबुकमध्ये राहिल्याने प्रभाग रचनेचे प्रारुप पाहता या दोघांनाही आतापासूनच सेफ करण्यात आले असल्याचे लपून राहिलेले नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...

पोटदुखीवर मुख्यमंत्री उपाय करतील! राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले, ‘यांचे’ वक्तव्य चर्चेत..

मुंबई | नगर सहयाद्री मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयावरुन राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा...