अहमदनगर । नगर सहयाद्री-
स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यांविरोधात कंबर कसली आहे. फेब्रुवारी महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२६ अवैध धंद्यांवर कारवाई केली. यामध्ये १४३ आरोपींकडून ७ लाख ४० हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना फेब्रुवारी २०२४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटण करण्याच्या दृष्टीने अवैध धंद्यांची माहिती घेत त्यांवर कारवाई करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके नेमून अवैध धंद्याची माहिती घेत कारवाई करण्याचे सूचित केले.
फेब्रुवारी महिन्यात या पथकांनी अहमदनगर जिल्ह्यात १२६ अवैध धंद्याविरुध्द कारवाई करुन ७ लाख ४० हजार ६२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत १४३ आरोपी ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आदींच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.
८६ अवैध दारु अड्ड्यांवर छापा
या पथकांनी अहमदनगर जिल्ह्यातील अवैध दारु विक्री करणारे ८६ ठिकाणी छापे टाकून ५ लाख २५ हजार १०० रुपये किंमतीची अवैध देशी, विदेशी दारु तसेच तयार गावठी हातभट्टी व कच्चे रसायन नष्ट करून ८७ आरोपींविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करुन कारवाई केली.
४० जुगार, बिंगो अड्ड्यांवर छापे
जुगार, मटका, बिंगो चालविणारे ४० ठिकाणी कारवाई करुन २ लाख १५ हजार ५२० रुपये किंमतीची रोख रक्कम व जुगाराची साधने जप्त करुन ५६ आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे कारवाई केलेली आहे.