अहमदनगर | नगर सह्याद्री
महापालिकेची मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली वाढत नसल्याने, तसेच वसुली कर्मचारी व प्रभाग अधिकार्यांकडून बड्या थकबाकीदारांवर जप्ती कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने चारही प्रभाग अधिकार्यांसह ६० वसुली लिपिकांचे पगार थांबवण्याचे आदेश प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी दिले आहेत. यासंदर्भात प्रभाग अधिकारी, कर निरीक्षक व वसुली लिपिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
चालू वर्षात कराची थकबाकी २५०.७३ कोटींवर पोहोचली आहे. त्यापैकी अवघी ५० कोटी रुपये वसुली झाली आहे. वसुलीचे प्रमाण २० टक्केच आहे. प्रशासक जावळे यांनी वारंवार वसुली वाढवण्यासाठी बैठक घेऊन नळ कनेशन तोडणे, मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाच्या अखत्यारीतील बड्या थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांची नावे फ्लेसवर प्रसिद्ध करण्यात आली होती. आत्तापर्यंत ६८७ नळ कनेशन तोडण्यात आले असून, ५४ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र, यात बड्या थकबाकीदारांवर कारवाई होत नसल्याने वसुलीला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. मागील १२ दिवसात फक्त ३ कोटी रुपये वसुली झाली आहे.
वसुली होत नसल्याने मनपा आर्थिक अडचणीत आली असून महावितरण, मुळा पाटबंधारे विभाग, ठेकेदार, पुरवठादारांचा प्रशासकांकडे बिलांसाठी तगादा सुरु आहे. त्यामुळे प्रशासक जावळे यांनी अखेर कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून प्रभाग अधिकारी व वसुली लिपिकांचे पगार थांबवण्याचे आदेश दिले आहेत.