श्रीरामपूर । नगर सहयाद्री
एका अल्पवयीन मुलीला आजीकडे सोनई येथे सोडायला जाताना रस्त्यात लॉजवर नेऊन बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी स्वप्निल जैन या तरुणाविरुध्द श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अल्पवयीन मुलीने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी स्वप्निल जैन याच्यासोबत एक महिन्यापासून स्नॅप चॅटवर ओळख झाली होती. तेव्हापासून आम्ही दोघे स्नॅप चॅट, फोन कॉलवर बोलत होतो. दि. 27 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास माझ्या फोनवरून स्वप्निल यास फोन केला, मी त्याला सांगितले की, उद्या माझ्या आजीच्या घरी सोनईला जायचे आहे.
त्यावेळी तो मला म्हणाला, मी तुला सोनईला सोडतो, आपण दोघे जावू, त्यावर दुसर्या दिवशी स्वप्नीलचा मिस कॉल व मेसेज आल्याने मी त्यास दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास फोन केला व मला सोनईला जायचे आहे, असे सांगितले. स्वप्नीलने मला एका ठिकाणी येण्यास सांगितले. मी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी गेले, तेव्हा तेथे स्वप्नील व त्याचा मित्र हे दोघे पांढर्या रंगाची होंडा सिटी गाडीमध्ये बसलेले होते. स्वप्नील जैन याने मला गाडीत बसण्यास सांगितल्याने मी गाडीत बसले. आम्ही तिघे सोनईला जाण्यासाठी निघालो, सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास सोनईकडे जात असताना स्वप्नीलने त्याचा मित्र तुषार तायड यास उंबरे परिसरातील एका लॉजवर थांबण्यास सांगितले.
लॉजवर नेवून मला लग्राचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर मला सोनई येथे आजीच्या घरी नेवून सोडले. नंतर घडलेला प्रकार वडिलांना सांगितला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात स्वप्निल जैन याच्याविरुध्द पोस्को कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान सोळंके करीत आहेत. हा प्रकार सदर अल्पवयीन मुलीच्या वडिलांना समजल्यानंतर त्या पित्याचा संताप अनावर झाला. त्यामुळे त्यांनी सदर आरोपीच्या येथील छत्रपती शिवाजी रोडवरील ‘चायवाला’ या हॉटेलची तोडफोड केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी स्वप्नील जैन पसार झाला आहे. शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.