माजी मंत्री, चेअरमन शिवाजी कर्डीले यांची माहिती
अहमदनगर / नगर सह्याद्री –
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न प्राथमिक वि.का. सेवा सहकारी सोसायटयांनी ज्या नियमित पिक कर्जदार सभासदांकडून व्याज वसुल केलेले आहे अशा दि.३१ मार्च २०२४ अखेरील रू. ३.०० पर्यतच्या मुद्दल रकमेवरील अथकित नियमित पिक कर्जदार सभासदांचे व्याज प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या खाती जमा करण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळ सभेत घेण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
शासनाच्या सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रकीय सुचनेनुसार हे व्याज परत करणार असुन दिनांक ०१ मार्च २०२४ ते दि.३१ मार्च २०२४ अखेर पिक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकरी कर्जदार सभासदांना त्यांनी भरलेले व्याज परत करावयाचे बँकेने ठरविले असुनया संदर्भात बँकेच्या सर्व शाखाधिकारी व प्राथमिक विविध कार्यकारी सेवा संस्थांना सविस्तर परिपत्रकाव्दारे पिक कर्ज व्याज वसुली दि.२२ एप्रिल २०२४ अगोदर जमा करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. याची कार्यवाही आजपासुन करावयाची असल्याचेही शाखांना व प्राथमिक वि.का. सेवा सह.संस्थांना सुचना दिलेल्या असल्याचेही माहिती चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी दिली.
ज्या शेतकरी सभासदांनी दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत विहीत मुदतीत पिक कर्ज नियमित भरणा केलेला आहे अशा सर्व शेतकरी सभासदांना नियमानुसार खरीप पिक कर्ज वितरीत करण्याचे काम शाखा व प्राथमिक वि.का. सेवा सह. सोसायटी पातळीवर चालु असुन दि. ३१ मार्च २०२४ अखेर जिल्हयातील ३ लाख २२ हजार शेतकरी सभासदांना रू.२५८२ कोटीचे खरीप पिक कर्ज व ३९ हजार शेतकरी सभासदांना रू.४७१ कोटी अशी एकुण रू.३०५३ हजार कोटीचे पिक कर्ज वितरीत केले आहे. मार्च २०२४ अखेर बँकेचा एकूण वसुल ४७.१८% इतका झालेला असुन शेतकरी सभासदांना सन २०२४-२५ साठीचे पिक कर्ज मोठ्या प्रमाणावर वाटपाचे कामकाज चालु असल्याची माहीतीही बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी दिली.