नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ईडीच्या सुत्रांनी ‘सध्या तरी नाही’ असा दावा केला आहे. केजरीवाल यांच्या अटकेबाबत ईडीच्या सूत्रांनी दावा केला आहे की, सध्या त्यांना अटक करण्याची कोणतीही योजना नाही.
ईडी त्यांच्या पत्रांचे पुनरावलोकन करत आहे. त्यानंतर केजरीवाल यांना चौथे समन्स जारी केले जाऊ शकते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्यात अटक होण्याची भीती असताना ईडी आता त्यांना चौथ्यांदा समन्स पाठवण्याची तयारी करत आहे.
अंमलबजावणी संचालनालयाशी (ईडी) संबंधित उच्च सूत्रांनी सांगितले, की सध्या केजरीवाल यांनी पाठवलेल्या पत्राचा आढावा घेतला जात आहे. यानंतर त्यांना चौथे समन्स पाठवले जाईल. ईडी आज केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापे टाकणार असल्याचा दावा हे अफवा असल्याचे म्हटले आहे.
केजरीवाल यांना ३ समन्स बजावून चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले होते. मात्र, केजरीवाल अद्याप ईडीसमोर हजर झाले नाहीत. आम आदमी पार्टीचा दावा आहे की, केजरीवाल यांना अटक करण्यासाठी ही प्रक्रिया केली जात आहे. ईडी त्यांना चौकशीच्या बहाण्याने बोलावून अटक करू इच्छित आहे.
जर ईडीला चौकशी करायची असेल तर ते आपले प्रश्न लिहून केजरीवाल यांना देऊ शकतात. बुधवारपासून आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केजरीवाल यांच्या अटकेची भीती व्यक्त करण्यास सुरुवात केली. ईडी केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापा टाकून त्यांना अटक करू शकते, असा दावा आप नेत्यांनी केला होता.