निघोज / नगर सह्याद्री : राज्य सरकार पतसंस्था ठेवींना संरक्षण देण्यासाठी त्वरित उपाययोजना करणार आहे. सहकारी बँकासारखी पाच लाखांच्या ठेवींना संरक्षण देणारी उपाययोजना करत असल्याची माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. राजगुरुनगर येथील एका नामांकित पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
खेडचे आमदार दिलीप मोहिते, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, राजगुरुनगर बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, जयहिंद पतसंस्थेंचे अध्यक्ष नेहरकर आदी सहकारी पतसंस्था चळवळीतील अनेक दिग्गज पदाधिकारी व संचालक यावेळी उपस्थित होते.
वळसे पाटील यावेळी म्हणाले पतसंस्था चळवळ ही सहकारातील अत्यंत महत्त्वाची चळवळ असून पतसंस्थांचे योगदान महत्वपूर्ण आहे. सध्या पतसंस्था चळवळीला संशयाचे वातावरण असून अशी काही परिस्थिती नाही. नगर व पुणे जिल्ह्यात पतसंस्था चळवळ मोठ्या प्रमाणात आहे.
ग्रामीण भागासाठी सर्वाधिक योगदान देणार्या पतसंस्था चळवळीला राज्य सरकार वार्यावर सोडून देणार नाही यासाठी सध्या त्वरित उपाययोजना करण्यासाठी सरकार सर्वतोपरी योजना आखीत असून सध्या १०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सहकारी बँकांना जशा प्रकारे पाच लाखाच्या ठेवींना संरक्षण दिले जाते तशाप्रकारे पतसंस्थांना सुद्धा पाच लाखांच्या ठेवींना संरक्षण देण्यासाठी त्वरित उपाययोजना करणार असल्याची ग्वाही सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.