Lok Sabha Election 2024: भाजपने राज्यातील २० लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. महायुतीचा फॉर्म्युला ठरला नसल्याने मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही उमेदवाराची अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आता समोर येत आहेत. तसेच महाविकास आघाडीचाही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१-१३-४ असा महायुतीचा फॉर्म्युला असणार आहे. यामध्ये भाजप ३१ जागा, शिवसेना शिंदे गट १३ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) ४ लोकसभेच्या जागा मिळतील, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचा देखील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने दोन फॉर्म्युले ठरवले आहेत. ज्यामध्ये वंचित महाविकास आघाडीसोबत आल्यास आणि सोबत न आल्यास असा विचार करुन हे फॉर्म्युले ठरवण्यात आले आहेत. वंचित महाविकास आघाडीसोबत आल्यास २०-१५-९-४ असा जागावाटपाचा फॉर्म्युला असेल.
ज्यामुळे शिवसेना ठाकरे गट २०, काँग्रेस १५, राष्ट्रवादी ९ आणि वंचित ४ जागा असा फॉर्म्युला असणार आहे. तर वंचित महाविकास आघाडीसोबत न आल्यास २२-१६-१० असा फॉर्म्युला असेल. यामध्ये ठाकरे गटाला २२ जागा, काँग्रेसला १६ जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला १० जागा मिळणार आहे.