मुंबई। नगर सहयाद्री-
Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात कराची येथील रुग्णालयात दाखल केले असून, पाकिस्तानमध्ये कोणीतरी त्याच्यावर विषप्रयोग केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात होता. प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याचे बोलले जात होते. मात्र दाऊदचा जुना सहकारी छोटा शकील याने दाऊदच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या चर्चा उडवून लावत तो हजार टक्के ठणठणीत असल्याचा दावा केला आहे.
ना दाऊदला ना विषबाधा झाली आहे, ना त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. दाऊद ’भाई’ एक हजार टक्के ठणठणीत आहे. त्याच्या मृत्यूच्या बातम्या निरर्थक आणि निराधार आहेत, असे छोटा शकीलने सोमवारी सांगितले. मुंबई पोलिसातील काही वरिष्ठ अधिकार्यांनी दाऊद मरणासन्न अवस्थेत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही.
दाऊदशी संबंधित विविध सूत्रांशी पडताळणी करण्याचा प्रयत्न केला असता, दाऊद फक्त जिवंतच नाही, तर सुखरुप असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानातील रुग्णालयात तो गेला असेलच, तर केवळ जुन्या आजारांवरील उपचारासाठी, असे म्हटले जात आहे.
एका पोलीस अधिकार्याच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सूत्रांद्वारे दाऊदचा जवळचा सहकारी छोटा शकीलचा पाकिस्तानमधील ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला. छोटा शकील त्याच्या स्वतःच्या घरात असल्याची माहिती समोर आली आहे. या अधिकार्याच्या म्हणण्यानुसार, दाऊदला काही झाले असते, तर छोटा शकील त्याच्या घरात बसला नसता.
रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी मुंबईतील दाऊदच्या नातेवाईकांच्या घरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अनेकांकडून माहिती घेण्यात आली, पण दाऊदचा मृत्यू झाला किंवा त्याला विषबाधा झाल्याची कोणतीही चर्चा कुटुंबात आढळून आली नाही.