पुणे / नगर सह्याद्री :
राज्यभरातील थंडी आता गायब झाल्याचं चित्र आहे. अनेक जिल्ह्यांत वाढलेली थंडी पुन्हा गायब झाली आहे. तर आता ऐन थंडीच्या काळात राज्यातील बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरडं वातावरण तयार झालं आहे. आज (शुक्रवारी) कोल्हापूर, सातारा, सांगली या तीन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांमध्ये देशभरातील तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होते. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. थंडीचा जोर पूर्णपणे कमी झाला, तर काही भागात उकाडा जाणवू लागला आहे. 9 डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत शुष्क अन् कोरडे वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे, तर 7 डिसेंबरपासून पुन्हा तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे. आज (शुक्रवारी) राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
छत्रपती संभाजीनगर काल (गुरूवारी) जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शहर आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. खुलताबाद, सिल्लोड, पैठण, वैजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाऊस कोसळत आहे. तर अनेक भागांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे .या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.(Maharashtra Weather Update)
लातूर शहर आणि परिसर देवणी शहर परिसरात जोरदार पाऊस
लातूर जिल्ह्यातील अनेक भागात मध्यरात्री पावसाची हजेरी लावली. पावसानंतर वातावरणात गारठा वाढला आहे. लातूर शहर आणि परिसर देवणी शहर आणि परिसर निलंगा तालुक्यातील काही भाग या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. लातूर शहरासह जिल्ह्यातील देवणी निलंगा तालुक्यातील काही भागांमध्ये मध्यरात्री अचानक पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री अचानक आलेल्या पावसामुळे बाहेर असलेल्या लोकांची तारांबळ उडाली.
मध्यरात्री अचानक लातूर जिल्ह्यातील लातूर शहर आणि परिसर देवणी परिसर त्याचबरोबर निलंगा तालुक्यातील खरोसा भाग या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. कव्हा, हरंगुळ, खोपेगाव, सारोळा, बाभळगाव या भागातही रिमझिम पावसाची हजेरी होती. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारठा वाढला आहे. या पावसामुळे पिकावर रोगराई पडण्याची शक्यता दाट झाली आहे. मागील काही दिवसापासून वातावरणात म्हणावा तसा गारवा जाणवत नव्हता. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे वातावरणात गारठा आता वाढला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील काही भागात रिमझिम अवकाळी पाऊस सलग दोन दिवस पाऊस कोसळल्यामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत आले आहेत. काल (गुरूवारी) रात्री अनेक भागात रिमझिम पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे फळबागांचं नुकसान झालं आहे.
नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं
नाशिक जिल्ह्याला जोरदार अवकाळी पावसाने झोडपले, गुरुवारी रात्रीपासून विविध भागात पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी द्राक्षबागा आडव्या झाल्या. शेतकऱ्यांची शेतातील पिके वाचवण्यासाठी धावपळ उडाली. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.