पुणे । सहयाद्री नगर
राज्यात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. काँग्रेसनेही आपली कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पाश्ववभूमीवर आता पुण्यातील उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी मैदानात उतरणार आहेत.
राज्यात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पुण्यामध्ये महाविकास आघाडीकडून आमदार रविंद्र धंगेकर आणि महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये
थेट लढत होणार आहे.
एकीकडे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली असताना आता रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी तसेच प्रियांका गांधीही मैदानात उतरणार आहेत.रविंद्र धंगेकर यांच्यासमोर भाजपचे मुरलीधर मोहोळ तसेच वंचित आघाडीमध्ये गेलेले वसंत मोरे यांचेही कडवे आव्हान पाहायला मिळणार आहे.
काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांच्यासह प्रियांका गांधी, आणि आदित्य ठाकरे पुण्यात रोड शो करणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची देखील पुण्यात सभा होणार असल्याची माहिती काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.