अहमदनगर ।नगर सहयाद्री
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर मतदारसंघात राजकीय तापमान वाढले असून, काँग्रेसच्या उमेदवारीसाठी विद्यमान आमदार लहू कानडे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले यांच्यात तीव्र स्पर्धा पाहायला मिळत आहे. आ. कानडे यांनी शुक्रवारी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची भेट घेतली, तर शनिवारी भाजपाचे मंत्री गिरीष महाजन यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. या घडामोडींनी राजकीय विश्लेषकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी आ. लहू कानडे आणि हेमंत ओगले यांनी मतदारसंघात आपापल्या स्वतंत्र संवाद यात्रा सुरू केल्या आहेत. हेमंत ओगले यांना जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे (ससाणे गट) यांचा खंबीर पाठिंबा असून, ससाणे-ओगले जोडी एकत्रितपणे मतदारसंघ पिंजून काढत आहे. दुसरीकडे, आ. कानडे आपल्या कार्यकर्त्यांसोबत प्रत्येक गावात जाऊन पाच वर्षांत केलेल्या कामाचा आढावा मतदारांसमोर सादर करत आहेत.
आ. कानडे यांची मंत्री महाजन यांच्याशी चर्चा
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन काल श्रीरामपूरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी आ. कानडे यांनी नेवासा रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये ना. महाजन यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर राजकीय विश्लेषकांच्या चर्चा रंगल्या आहेत.
माजी आ. मुरकुटे यांची सावध भूमिका
माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी मात्र या स्पर्धेतून अलिप्तता दाखवली आहे. श्रीरामपूर तालुक्यात त्यांना मानणारा एक गट आहे, शिवाय अशोक कारखान्याच्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी आपला प्रभाव टिकवून ठेवला आहे. आ. कानडे यांनी त्यांना निवडणुकीत मदतीची विनंती केली असता, मुरकुटे यांनी कोणत्या पक्षाचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर मदतीचा विचार करण्याची भूमिका घेतली आ
स्वागत करणे माझी जबाबदरी
मतदारसंघात राज्याचे मंत्री आल्याने लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे स्वागत करणे ही माझी जबाबदरी असल्याने ना. महाजन यांचा सत्कार करण्यासाठी गेलो होतो.
– लहू कानडे ( आमदार, श्रीरामपूर विधानसभा)