अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मूग व मूगडाळीचा ६०.९९ लाखांचा माल घेऊन त्या मालाच्या बिलाचे ३८.६९ लाख रुपये न देता अहिल्यानगरच्या व्यापाऱ्याची जळगाव येथील दोघांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ७ सप्टेंबर ते २९ डिसेंबर २०२४ दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी तक्रार अर्जाची चौकशी झाल्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत प्रकाश गांधी (वय ३९ रा. प्लॉट नं. १८, पुनम मोतीनगर, मार्केटयार्ड) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ममता संजय जैन व संजय नेमीचंद जैन (दोघे रा. शांतीनाथ इंपेक्स, एमआयडीसी, जळगांव) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ सप्टेंबर ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत व्यापारी गांधी यांनी जैन यांना ६० लाख ९९ हजार १०९ रुपये किमतीचा माल विक्री केला होता.
त्यापोटी जैन यांनी धान्य मालाचे व गाडी भाड्याचे २२ लाख २९ हजार १७० रुपये फिर्यादीला दिले. मात्र, उर्वरित ३८ लाख ६९ हजार ९३९ रुपयांची रक्कम न देता विश्वासघात करुन फसवणूक केली. फिर्यादी गांधी यांनी जैन यांना फोन करुन मालाच्या उर्वरित रक्कमेची मागणी केली असता, जैन यांनी कशाचे पैसे, मी माल घेतलेला नाही, परत पैशाचा विषय काढला, तर नगरमध्ये येऊन तुझे हातपाय काढील, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी गांधी यांनी या प्रकरणी तक्रार अर्ज पोलिसात दाखल केला होता. त्याची चौकशी केल्यानंतर कोतवाली पोलिसांनी गुरुवारी (२७ फेब्रुवारी) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सपोनि योगिता कोकाटे करत आहेत.