मुंबई। नगर सहयाद्री-
22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करणार आहे. त्या पाश्ववभूमीवर महाराष्ट्र्भर जल्लोषाचे वातावरण आहे. दरम्यान या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अयोध्येला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
राम मंदिरातील प्रभू श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील अनेक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा या सोहळ्यासाठी आमंत्रण मिळालेलं आहे. मात्र, या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार नाही याबाबत स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्वीट
जय श्री राम… अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीजी यांनी साकार केलं आहे. मोदीजींचे शतशः आभार!
‘अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.’ असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.