अहमदनगर। नगर सहयाद्री-
जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मित्राने धारदार शस्राने वार करून मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. मोल नवनाथ आठरे (रा. कौडगाव आठरे, ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने 4 मे 2024 रोजी रात्री त्याचा मित्र अविनाश बाळू जाधव (रा. मांडवे) यांचा खून केल्याची कबुली दिली आहे.
अधिक माहिती अशी: मांडवे (ता. पाथर्डी) येथील खून प्रकरणात मित्रच खुनी निघाल्याने त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अमोल व अविनाश दोघे मित्र होते. त्यामुळे अमोलचे आईवडिल त्याला व अविनाशला रागावून बोलत असे.
1 मे 2024 रोजी अविनाशने अमोलच्या वडिलांना तिसगावात गाठले व त्याने शिवीगाळ करून हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. त्यांच्याकडील दूध सांडून दिले. याच कारणातून अमोलने अविनाशला जाब विचारला असता त्याने अमोलला सुध्दा शिवीगाळ, दमदाटी केली होती. त्याच दिवशी अविनाशचा काटा काढण्याचे अमोलने ठरवले होते.
4 मे रोजी रात्री 12 ते 1 सुमारास अमोलने घरातून ऊस तोडण्याचा कोयता घेतला व दुचाकीवरून अविनाशच्या घरी निघाला. अमोलने त्याच्याकडील कोयत्याने अविनाशच्या डोक्यात व पाठीवर वार करून त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
असा अडकला जाळ्यात
गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पथकाने अविनाशचे कोणासोबत वाद होते का? याची माहिती घेतली असता त्यांचा मित्र अमोल आठरे याचे नाव समोर आले. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने अविनाशचा खून केल्याची कबुली दिली. खुनी अमोल आठरे याला अटक करून पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.