अहमदनगर | नगर सह्याद्री
नगर शहर, केडगाव माझ्या मनात वसलेले आहे. तुमच्या प्रेमाने, मार्गदर्शनामुळे मी उच्चस्थानी पोहोचलो. आज तुमच्यात येऊन कार्यक्रम करण्याची खूप इच्छा होती; पण आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधत आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, प्रेम, सहकार्य माझ्या पाठीशी होते आणि हीच माझी फार मोठी जमेची बाजू होती, असे प्रतिपादन माजी महापौर संदीप कोतकर यांनी केले.
केडगाव येथे संदीप कोतकर युवा मंचच्या वतीने संदीप कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी कोतकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी ‘चला हवा येऊ द्या’ हा विनोदी कर्यक्रम झाला. कार्यक्रमास केडगाव, नगर शहर व पंचक्रोशीतील नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय क्षेत्रातील नेते उपस्थित होते. कोतकर गट आता भाजपला जवळ करत राजकारणात सक्रिय होणार अशी चर्चा रंगली आहे.
केडगावात भाजप खासदार सुजय विखे यांच्या फोटो समवेत संदीप कोतकर यांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकले आहेत. मागील महापालिका निवडणुकांतही कोतकर गटाने काँग्रेसऐवजी भाजपला जवळ केले होते. आगामी काळात भाजप पक्षातून कोतकर गट नगर शहर व केडगावच्या राजकारणात सक्रिय होणार का, हे पाहणे औत्सुयाचे ठरेल.
आगामी निवडणुकांसाठी नियोजनपूर्व तयारी
आगामी महापालिका व विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने निवडणूक रणांगणात उतरण्यासाठी कोतकर गटाने कंबर कसली आहे. महापालिका निवडणुकीत केडगावात सर्व जागांवर नगरसेवक निवडून आणण्यासाठी कोतकर गट तयारी करत आहे. तसेच विधानसभा निवडणुकीतही निर्णायक भूमिका बजावण्यासाठी तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यानुसार केडगावमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला जात आहे
. केडगावमध्ये अखंड हरिनाम सप्ताह, नामांकित व्याख्यात्यांची व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर भर दिला आहे. २३ जानेवारीला ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २४ जानेवारीला शिरूर येथील मंगल कार्यालयात संदीप कोतकर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली. यातून जनसंपर्क पुन्हा एकदा दांडगा करत आगामी निवडणुकांची तयारी सुरु असल्याचे बोलले जात आहे.