अहमदनगर । नगर सहयाद्री:-
आजार पसरू नयेत, यासाठी धूर फवारणीचे काम सुरू आहे. मात्र, नागरिकांच्या घरात अथवा घराच्या आवारात साचलेल्या पाण्यात डेंगीचा प्रादुर्भाव करणारे एडिस इजिप्तीचे डास आढळले तर संबंधिताला अर्थिक दंड करण्यात येणार आहे, असा अजब फतवा महापालिकेने काढला आहे.
शहरात मागील वर्षी अनेकांना चिकनगुनियाची लागण झाली होती. यावर्षी या आजाराची लागण होवू नये, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कंटेनर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी साचलेल्या पाण्यात डेंगीचे डास आहेत का, याची पाहणी करण्यात येत आहे. भंगाराचे दुकान, टायर पंक्चर दुकाने यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे.
घरात किंवा घराबाहेर आवारात जर साचलेल्या पाण्यात डेंगी आजाराचा प्रादुर्भाव करणारे एडिस इजिप्तीचे डास आढळले, तर संबंधित नागरिकांना अर्थिक दंड करण्यात येणार आहे. तसे आदेश आयुक्त डांगे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान,आपल्या परिसरात डास झाल्यास मनपाच्या आरोग्य विभागालाकळवून धूर फवारणी करून घ्यावी. धूर फवारणी विनामुल्य केली जाणार आहे. पाणी साठवून डासांच्या उत्पत्तीला वाव देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांना दंड केला जाणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
अशी घ्या काळजी
डासांची उत्पत्ती साचलेल्या पाण्यात होते. त्यासाठी नगरकरांनी कुठे पाणी साचवून ठेवू नये.
घरातले गंजलेले सामान, जुने टायर, कुंड्या, हौद, विहीरी, गटारी येथे पाणी साचू देवू नये.
वापरासाठी लागणारे साचवलेले पाणी झाकून ठेवावे. त्यावर कीटकनाशकाची फवारणी करावी.