अहमदनगर | नगर सह्याद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशाचा विकास होत आहे. विविध विकास योजनांबरोबरच अयोध्या येथील श्री प्रभू राम मंदिर उभे राहावे ही देशवासयांची इच्छा त्यांनी पूर्ण केली. श्री प्रभू रामचंद्र १४ वर्षे वनवास संपवून अयोध्येत आल्यानंतर नागरिकांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली. आता अनेक वर्षाचा मंदिर उभारण्याचा वनवास संपला असून प्रभू मंदिरात येतील. या मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल. त्यावेळी आपण सर्वांनी दिवे लावून लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करा असे आवाहन खा.डॉ.सुजय विखे यांनी केले.
माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या पाठपुराव्यातून आणि खा.डॉ.सुजय विखे व आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून विविध विकास कामाचा प्रारंभ तसेच साखर, डाळ वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, माजी नगरसेवक रूपाली वारे, संध्या पवार, सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, रामदास आंधळे आदींसह नागरिक उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, मनपा मधील नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपला असला तरी जनतेच्या मनातले सेवक म्हणून तुम्ही राहणार आहात. कारण तुम्ही अनेक वर्षांपासून या भागातील जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावले आहेत. त्या माध्यमातून समाजामध्ये ऋणानुबंध निर्माण झाले असून एक प्रेमाचे नाते तयार झाले आहे.
आपण सर्वजण मिळून प्रभू श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा करूया असे ते म्हणाले. माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले की, प्रभाग दोन मधील विकास कामांचे उद्घाटन खा.डॉ. सुजय विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत झाले असून आता लवकरच निर्मलनगर येथे साखर व डाळ वाटप करण्यात येईल.