अहिल्यानगर । नगर सहयाद्री
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून कायनेटीक चौकात सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान एका कर मधील व्यक्तीच्या खिशात सात लाख रुपयांची रक्कम सापडली असून रक्कम जप्त करण्यात आली. कार मधील दोघांनी या रकमेबाबत असमाधानकारक उत्तर दिल्याने सदरची रक्कम व कार असा 29 लाखांचा मुद्देमाल कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याची माहिती निवडणूक आयोग व आयकर विभागाला कळविली असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली.
अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर पोलीस उपअधीक्षक भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी कायनेटीक चौकात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री नाकाबंदी केली होती. गुरूवारी पहाटे दीड ते अडीचच्या दरम्यान कारची (एमएच 19 ईजी 6311) तपासणी पोलिसांनी केली असता डिक्कीमध्ये पाच लाखांची रोकड मिळून आली. तसेच कारमधील ललित मनोहर पाटील (वय 22 रा. गिरड, ता. भडगाव, जि. जळगाव) यांच्या खिशात एक लाख तर हर्षल जगन्नाथ पाटील (वय 27 रा. चितोड रस्ता, शिवसागर कॉलनी, धुळे) यांच्या खिशात एक लाख अशी एकूण सात लाखांची रोकड मिळून आली.
दरम्यान, या रोकड बाबत पोलिसांनी त्या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी असमाधानकारक उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणताही व्यक्ती हा त्याच्या ताब्यात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम बाळगू शकत नसल्याने सदरची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.