मुंबई । नगर सहयाद्री-
कोनाड्यात पडलेल्या छत्र्या आता बाहेर येतील. कुठल्यातरी बॅगेत ठेवलेले रेनकोटही बाहेर डोकावू लागतील. गेल्यावर्षी खास असे घेतलेले शूज आणि सॅण्डल्सही कपाटाबाहेर येण्याची चाहूल लागलीय. कारण वारा सुटलाय… पण मंडळी, फक्त वारा नाही, तर याच वाऱ्याच्या हातात हात घालून तो आलाय… आपल्याला ओलेचिंब करायला.
पुढील २४ तासामध्ये महाराष्ट्रात मेघगर्जनेसह धारानृत्य पाहायला मिळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईसह राज्यात काल अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आजपासून पुढील ४ दिवस राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज (९ जून) पासून मान्सूनचा प्रवास वेगाने होणार आहे. त्यामुळे राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा-विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
सोमवारी कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या पुण्यात धुव्वाधार पाऊस सुरू असून मुंबईतही पावसाचं आगमन झालं आहे.
पुढील २४ तासामध्ये मुंबईसह उपनगर, पालघर, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सांगली छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.