अहमदनगर / नगर सह्याद्री : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवक कमल सप्रे यांनी राजीनामा दिला आहे. मराठा समाजाला राज्य सरकार आरक्षण देत नाही.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करीत आहेत. त्यांची प्रकृती खूप खालवली आहे. आज पर्यंत मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तरी त्या आत्महत्या करणाऱ्यांच बलिदान वाया जाऊ नये व मराठा समाजाला हक्काच आरक्षण मिळावं यासाठी मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे त्या म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, सकल मराठा बांधव मागील ४० वर्षांपासून आरक्षणासाठी लढा देत आहेत. राज्यकर्ते फक्त मराठ्यांचे राजकारणासाठी वापर करीत आहेत. राज्य सरकारला आरक्षण देण्यासाठी अजून किती बळी हवे आहेत. आज समाजबांधवावर होणारा अन्याय सहन होत नसल्याने, ज्या समाजाने मला पदावर बसवले त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी आणि भविष्यात समाजावर होणाऱ्या अन्याया विरोधात लढण्यासाठी नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे सप्रे म्हणाल्या.
महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाण असताना राजकारणी स्वतः फायद्यासाठी वापर करतात. याचा निषेध म्हणून आणि अहिल्यानगर व नागापूर-बोल्हेगांव परिसारातील जनतेला न्याय मिळावा यासाठी मी नैतिकतेने राजीनामा देत आहे. यापुढे मी व माझे पती दत्ता पाटील सप्रे समाजाच्या विकासासाठी, सुख-दुःखासाठी बांधील आहोत.
मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा असून सरकारने तातडीने आरक्षण जाहीर करावे असे कमल सप्रे यांनी राजीनामा पत्रात नमूद केले. हा राजीनामा मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.