मंत्रिमंडळ विस्तार हालचालींना वेग / राष्ट्रवादी काँग्रेसचे ०७ कॅबिनेट, ०३ राज्यमंत्रिपदाचे चेहरे निश्चित?
मुंबई | नगर सह्याद्री
राज्याला नवे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी पार पडला. त्यानंतर आता महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारांच्या हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शनिवारी राज्यातील महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे.
महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची आज बैठक पार पडली. प्रफुल्ल पटेल यांच्या सीजे हाऊस येथील निवासस्थानी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यात ०१ तास बैठक झाली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बैठकीत चर्चा झाली असून या बैठकीत ०७ कॅबिनेट आणि ०३ राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ८ डिसेंबर रोजी विधानसभेच्या नव्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. भाजपकडून ८ डिसेंबरला दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार आहे. ९ डिसेंबरला नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार की नवा अध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्यापासून राज्याचे विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. तर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदावर भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज शपथ घेतील.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात निवडणून आलेले प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार आहेत. विधानसभेचे एकूण २८८ प्रतिनिधी उद्या आमदारकीची शपथ घेणार आहेत. हंगामी अध्यक्षांनी आज शपथ घेतल्यानंतर विशेष अधिवेशनात आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.तर दुसरीकडे मंत्रीपदाची आशा बाळगून असलेल्यांचा काहीसा हिरमोड झाला. भव्य शपथविधी सोहळा केवळ तिघांचा न ठेवता इतर मंत्र्यांचा सुद्धा होईल अशी काही नेत्यांना अपेक्षा होती. पण गुरूवारी फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. या शपथविधी सोहळ्यादरम्यान अखेरच्या क्षणापर्यंत काही नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची आशा होती. किमान १० ते १२ मंत्र्यांचे शपथविधी होईल अशी अपेक्षा महायुतीच्या अनेक नेत्यांना होती. पण त्यांचा शपथविधी न झाल्यामुळे महायुतीमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळाली.
महायुतीचे मंत्री आठवडाभरात शपथ घेणार : भुजबळ
मंत्रिमंडळ स्थापनेच्या पद्धतींवर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा केली जाईल. यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना करत महायुतीतील मित्रपक्षांचे मंत्री आठवडाभरात शपथ घेतील, अशी शयता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यत केली. भुजबळ म्हणाले, राज्यात आनंदाचे वातावरण आहे. कारण १९८५ साली मी पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हापासून मी विधिमंडळात आहे. तेव्हापासून इतकं मोठं बहुमत सरकारी पक्षाला मिळाल्याचे मी पहिल्यांदाच पाहतो आहे. अशा बहुमतासाठी लोकांची मने जिंकावी लागतात. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे तीन प्रमुख नेते आहेत. ते तीन जण एकत्र आले की तिन्ही पक्ष एकत्र आल्याचा संदेश जाईल. प्रत्येक पक्षाचे किती मंत्री आणि कोणती खाती मिळणार याची चर्चा सुरू आहे. येत्या आठ दिवसांमध्ये इतर मंत्र्यांचादेखील शपथविधी होईल, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
गृहमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य!
राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. या सरकारचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहतील. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिली सही गरजू रुग्णाला आर्थिक मदत देण्यासाठी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस यांनी पहिली-वहिली मुलाखत एबीपीला दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी राज्याच्या गृहमंत्रिपदावर भाष्य केलं आहे.
खातेवाटप जवळजवळ पूर्ण झालं
आम्हा तिन्ही पक्षांना जास्तीत जास्त मंत्रिपदं मिळावीत असं वाटतं. जेव्हा एखाद पक्ष चालवायचा असतो तेव्हा नेत्यांना संतुष्ट करावं लागतं. त्यामुळे खातेवाटपावर आमची चर्चा चालू आहे. आमची ही चर्चा आता जवळ-जवळ संपत आली आहे. आमचं मंत्रिपदांचं वाटप जवळजवळ पूर्ण झालं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
16 डिसेंबरच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे. त्यामुळे 16 डिसेंबरच्या अगोदरच आम्ही आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. गृहमंत्रिपदाबाबत आमची चर्चा चालू होती. मात्र या पदावरून आमच्यात ओढाताण वगैरे होतेय, असं काहीही नाही, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
गृहखातं, महसूल या खात्यांना थोडं महत्त्व असतं. आमच्या महायुतीत तीन पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांचा योग्य तो सन्मान देण्यात आला आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच गृहखातं तुमच्याकडेच असेल का? या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्मीतहास्य केलं आणि याबाबत जेव्हा निर्णय होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन, असं उत्तर दिलं.
दरम्यान, राज्यात आता सरकारची स्थापना झाल्यानंतर कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील आमदार मंत्रिपदासाठी लॉबिंग करत असल्याचं दिसतंय. त्यामुळे तसेच कोणत्या नेत्याची वर्णी मंत्रिपदी लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शपथविधी सोहळ्याकडे पाठ; ठाकरे, पवारांना भाजपाने सुनावलं
महाराष्ट्र राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते ‘देवेंद्र फडणवीस’ यांनी काल (दि. ५) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गज नेते आणि कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते.
मात्र, या सोहळ्याकडे विरोधकांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. आता यावरुनच भाजपाने विरोधकांवर निशाणा साधला आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर शपथविधी सोहळ्यातील अनुपस्थितीवरुन सुनावलं आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले की, ‘हिच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती, काल आझाद मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. या समारंभापासून व्यक्तीगत आमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे आणि शरद पवार व कॅाग्रेसचे नेते गैरहजर राहिले. हा लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा शपथविधी होता. लोकशाहीत लोकांनी दिलेला कौल स्वीकारून है नेते शपथविधी ला आले असते तर खरंच या नेत्यांना महाराष्ट्र हिताची व संविधानाची चाड आहे असा अर्थ निघाला असता. महाराष्ट्राचा विकासासाठी आम्ही एक आहोत असा संदेश दिला गेला असता.
२०१९ मध्ये उध्दव ठाकरे यांनी लोकांचा विश्वासघात करीत मविआसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस व तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. त्यापूर्वीची उदाहरणे आहेत.
निवडणुका संपल्या आता विकासासाठी आपण एक आहोत हा संदेश देता आला असता. मात्र पक्षीय स्वार्थापलीकडे आम्ही काहीच पाहू शकत नाही, महाराष्ट्राच्या हिताचा कोरड्या गप्पा मारतो व वेळ आली तर विरोधातच हेच या निमित्ताने या मंडळींनी दाखवून दिले. या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.