Politics News: राजकीय वर्तुळामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राव मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा दिल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. मात्र, पक्षातील मनमानीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा सध्या नंदुरबारमध्ये सुरू आहे.
राव मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांचे बंधू आहेत. त्यांची नंदुरबार जिल्ह्यात मोठी ताकद असून त्यांचा तगडा जनसंपर्क आहे. त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. मोरे हे आता कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार? याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला होता. पाचपैकी केवळ एका जागेवरच पक्षाचा उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागले आहेत.
लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून त्यांनी नव्याने पक्ष उभारणीला सुरुवात केली आहे. मात्र, तरीही अजित पवार गटातून अनेक नेते तसेच पदाधिकारी बाहेर पडत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून देखील पक्षांतर होण्याची सुरुवात होणार असल्याची चर्चा रंगली आहे.